लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत काही मतदारसंघांबाबत मतभेद असल्याची चर्चा आहे. काही जागांसाठी काँग्रेस आणि शिवसेनेच्या ठाकरे गटात रस्सीखेच सुरू असून अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. अशातच वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सामील होणार की नाही? याबाबतचा संभ्रम कायम आहे. प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला २६ मार्चपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. महाविकास आघाडीने वंचितला राज्यातील चार जागा देण्याचा प्रस्ताव दिला होता, जो प्रकाश आंबेडकर यांनी मान्य केलेला नाही, असं दिसतंय. दरम्यान, वंचितने मविआकडे सहा जागांची मागणी केली असल्याचं बोललं जात आहे. अशातच प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या आजोबांचा म्हणजेच दिवंगत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख करत मविआला टोला लगावला आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, गेल्या काही दिवसांमध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी युतीसंदर्भात त्यांची मतं मांडली. त्याबद्दल मी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो. मला आमच्या कार्यकर्त्यांसह सर्वांना सांगायचं आहे की, माझ्या आजोबांनी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर) चालवलेली चळवळ ही लाचारीच्या विरोधात होती. ही लाचारी मीदेखील मान्य करणार नाही. युतीमध्ये अडचण येईल म्हणून आम्ही कोणतेही व्यक्तीगत वाद किंवा हेवेदावे मध्ये येऊ दिले नाहीत. परंतु, जिथे चळवळीलाच लाचार केलं जातं, लाचार करून संपवलं जातं ते आम्ही मान्य करणार नाही. त्यामुळे मी सर्व शाहू, फुले आणि आंबेडकरी मतदारांना आवाहन करतो की, आपण जिंकलो पाहिजे ही माझी भावना आहे. परंतु, मी आज त्यांना सांगतो की चळवळीचा विचार अधिक महत्त्वाचा आहे. मी काही गोष्टी बोलू शकत नाही. परंतु, अनेक ठिकाणी आपण जिंकलो आहोत अशी परिस्थिती आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, आपण चळवळीचा अधिक विचार करायला हवा. व्यक्तीगत विचार हे त्या ठराविक व्यक्तीपर्यंत मर्यादित राहतात. परंतु, सार्वजनिक जीवनात, सार्वजनिक ठिकाणी सार्वत्रिक निर्णयास मान-सन्मान मिळाला पाहिजे. सध्याच्या परिस्थितीत वंचित बहुजन आघाडी जी भूमिका घेईल त्या भूमिकेला फुले, शाहू, आंबेडकरी विचारांच्या लोकांचा पाठिंबा मिळेल असं मी गृहित धरतो. आम्हाला सर्वांचा पाठिंबा मिळेल अशी अपेक्षा आहे.
हे ही वाचा >> महायुतीत नाशिकच्या जागेवरून संभ्रम? छगन भुजबळ म्हणतात, “शिंदे गटाएवढ्याच जागा..”
मविआकडून ‘वंचित’ला किती जागांचा प्रस्ताव?
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी वंचित बहुजन आघाडीला ४ जागांचा प्रस्ताव महाविकास आघाडीने दिला असल्याचे सांगितले होते. यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, “मी त्यांना (ठाकरे गट) त्या चार जागा परत देतो, त्यांनी त्या लढवाव्या. संजय राऊत हे चार जागा म्हणत असले तरी त्यांनी बैठकीला गेल्यानंतर एक अकोला आणि दोन दुसऱ्या जागा, अशा तीन जागा देण्यासंदर्भात सहमती दर्शवली होती. त्यामुळे खोटं बोलणं थांबलं पाहिजे.”