आगामी विधानसभा निवडणुकीत लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती होईल आणि राज्यात सत्ताबदल अटळ असल्याचा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी व्यक्त केला. मोठा भाऊ, छोटा भाऊ, असा वाद टाळून निवडून येण्याच्या क्षमतेच्या आधारावर जागावटप करण्याचा निर्धारही तिन्ही नेत्यांनी व्यक्त केला. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी यावेळी मतदारांचे आभार मानले. ज्या-ज्या मतदारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांवर विश्वास दाखवला त्यांना नाराज करणार नसल्याचं वक्तव्य केलं.
उद्धव ठाकरे म्हणाले, “लोकशाही वाचवण्यासाठी सर्वधर्मीयांनी मतदान केलं. ज्यामध्ये मराठी होते, हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चनही होते. मात्र वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की ‘गरज सरो वैद्य मरो’चे हे उत्तम उदाहरण आहे. उच्चवर्णीय हिंदूंनी भाजपाला मतदान केलं आणि उबाठा शिवसेना किंवा महाविकास आघाडीला नाही. या निवडणुकीत दलित, मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, बहुजन यांनी उबाठा शिवसेनेला आणि मविआला मतदान केलं. पण तुमचे पक्ष वाचवण्यात दलित, बौद्ध यांच्या भूमिकेचा उल्लेखसुद्धा तुम्हाला करावासा वाटत नाही. ही खरी त्यांची मानसिकता! दलित आणि बौद्धांनो आता शहाणे व्हा. तुम्ही त्यांचे पक्ष वाचवलेत पण तुम्ही त्यांच्या खिजगणतीतही नाही! घरात आहे पीठ…”
उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?
मुंबई आणि महाराष्ट्रात ‘एम’ घटकामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाला यश मिळाल्याच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांचा समाचार घेताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘एम’ म्हणजे मराठीबरोबरच आम्हाला हिंदू, मुस्लीम, ख्रिाश्चनांसह सर्व भाषिकांची मतं मिळाली आहेत. लोकशाही वाचवण्यासाठी सर्वधर्मीय आणि भाषकांनी महाविकास आघाडीला भरभरून मतं दिली. हजारो लोकांनी रक्त साडून मिळवलेली मुंबई भाजपाला लुटू देणार नाही, असा इशाराही ठाकरे यांनी यावेळी दिला.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीचा (एनडीए) महाविकास आघाडीसमोर (इंडिया) निभाव लागला नाही. तर देशभर इंडिया आघाडीने एनडीएसमोर मोठं आव्हान निर्माण केलं होतं. महाराष्ट्रात महाविकास आघाडीने ३१ जाग जिंकल्या तर महायुतीला अवघ्या १७ जागा मिळाल्या. राज्यात काँग्रेसने सर्वाधिक १३, ठाकरे गटाने ९ आणि शरद पवार गटाने ८ जागा जिंकल्या. तर महायुतीतल भाजपाने ९ शिंदे गटाने ७ आणि अजित पवार गटाने १ जागा जिंकली.