Prakash Ambedkar पोलीस कोठडीत संशयास्पदरित्या मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाची पहिली सुनावणी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात पार पडली. या प्रकरणी आता प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण काय?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतीची विटंबना झाल्यानंतर परभणीत हिंसाचार उसळला होता. यानंतर पोलिसांनी काहीजणांना अटक केली होती. यापैकी सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता. पोलिसांच्या मारहाणीमुळे सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचा आरोप झाला होता. मात्र, राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनाकडून हे सर्व आरोप फेटाळण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर सोमनाथच्या मृत्यूप्रकरणात दोषी पोलिसांवर कारवाई व्हावी, यासाठी सोमनाथ यांच्या आईने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर आज पहिली सुनावणी पार पडली असून यावेळी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईच्या बाजूने वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी स्वत: युक्तिवाद केला. त्यानंतर माध्यमांना याबाबत माहिती दिली.
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
“आज न्यायालयाने कस्टोडियन डेथ च्या संदर्भात मॅजिस्ट्रेटने चौकशी करावी अशीच तरतूद आहे. मात्र त्यांच्या निर्णयानंतर कुणी आणि कसा निर्णय घ्यायचा? पुढची चौकशी कशी करायची? यासंदर्भातला कायदा अपुरा आहे. त्यामुळे आम्ही न्यायालयाला सांगितलं की सोमनाथ सूर्यवंशी न्यायालयीन कोठडीत असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुढील कारवाई असेंब्ली किंवा पार्लमेंट करत नाही तोपर्यंत पुढची कारवाई कशी झाली पाहिजे याच्या गाईडलाईन्स कोर्टाने दिल्या पाहिजे. या प्रकरणी पुढील सुनावणी २९ एप्रिल रोजी होणार आहे. या प्रकरणात आम्ही विशेष तपास समिती नेमावी अशीही मागणी आम्ही केली आहे. ही एसआयटी सरकार नाही तर न्यायालय नेमेल. कोर्टाच्या अंतर्गतच ही समिती असेल. ही मागणी मान्य होईल का? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल. सरकारबाबत त्यांनी नोटीस काढली आहे.” असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.
मी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सांगितलं होतं की…
यानंतर प्रकाश आंबेडकर म्हणाले, “बदलापूरच्या प्रकरणातला मृत्यू हा देखील कस्टोडियन डेथचा प्रकार आहे. मात्र आई वडिलांनी याचिका मागे घेतली आहे. न्यायालयाने माणूस उभा केला आहे त्यांच्या मार्फत कोर्ट हे प्रकरण चालवतं आहे. त्या प्रकरणात काही कमतरता आहेत त्या या प्रकरणात आम्ही पूर्ण करु. या प्रकरणात राज्य शासनच आरोपी आहे. त्यामुळे चौकशी कशी होते आहे त्याचा नमुना आम्ही न्यायालयाला दाखवला. त्याआधारे आम्ही असं म्हटलं आहे की गाईडलाईन कोर्टाने द्याव्यात. आम्ही न्यायालयाकडे न्याय मागण्यासाठी आलो आहोत. मागील चार वर्षात ८७६ प्रकरणं अशी झाली आहेत. त्यापैकी कनव्हिक्शन कमी आहेत. कोर्टासमोर हेच सांगितलं सरकारच या प्रकरणात आरोपी आहे. त्यामुळे सरकारकडून आम्ही किंवा न्यायालयाने अपेक्षा ठेवणं आवश्यक नाही. यासंदर्भात माझी आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती त्यांना मी सांगितलं होतं की कायदा अपूर्ण आहे तो पूर्ण केल्यानंतर या प्रकरणी चौकशी होणार नाही अशी परिस्थिती आहे. तसंच सीआयडीला आरोपी म्हणून या प्रकरणात आणलं जाईल” असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.