कराड : काँग्रेसचे सातारा जिल्ह्यातील एक बडे प्रस्थ राज्यपालपदासाठी भाजपच्या वाटेवर असल्याचे डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केलेले विधान हास्यास्पद असून, त्याला गांभीर्याने घ्यायची गरज नाही. खरेतर या नेत्याचे नाव त्यांनी घ्यायला पाहिजे होते म्हणजे त्यांना उत्तर दिलं असतं अशा शब्दात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रकाश आंबेडकरांच्या त्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली.

विरोधीपक्ष म्हणवणारा काँग्रेस संघटनात्मक पातळीवर क्षीण होत चालल्याने तो पंतप्रधान नरेंद्र मोदींना अंगावर घेऊ शकत नाही, आता तर सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचे एक बडे प्रस्थ भाजपच्या वाटेवर असून, त्यांना राज्यपालपद कधी मिळणार एवढेच बाकी असल्याचा गौप्यस्फोट वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी कराडमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना केला होता आणि यावर माध्यमातून ते बडे प्रस्थ म्हणून पृथ्वीराज चव्हाणांचे नाव घेतले गेल्याने हा विषय उलट- सुलट चर्चेचा बनला होता.

हेही वाचा >>> ज्या देशाचा नेता सक्षम तोच देश प्रगतीपथावर; देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

चव्हाण पुढे म्हणाले, डॉ. प्रकाश आंबेडकरांनी गतखेपेस ‘एमआयएम’शी आघाडी केली होती. त्यातून सात टक्के मतांनी आमचे जवळपास सात उमेदवार त्यांनी पाडले आणि भाजपला निवडून दिले. त्यामुळे आताही त्यांनी तोच प्रयोग केला पण, आता ‘एमआयएम’च्या सोबत ते नाहीत. आणि आताची लढाई ही संविधान वाचवायची असल्याने  त्यांना मानणारा जो आंबेडकरी समाज आहे तोही आता त्यांच्याबरोबर नसल्याने त्यांना फार गांभीर्याने घ्यायची गरज नसल्याचा टोला पृथ्वीराज चव्हाणांनी लगावला.  डॉ. प्रकाश आंबेडकरांना माझ्या कुटुंबाची पार्श्वभूमी माहिती नाही. तीन पिढ्या आम्ही काँग्रेसच्या विचारापासून बाहेर गेलेलो नाही. त्यामुळे त्यांचे विधान हास्यास्पद असून, त्याला गांभीर्याने घ्यायची काही आवश्यकता नाही. त्यांनी माझं नाव घ्याव ना? म्हणजे मी उत्तर देतो असे चव्हाण यांनी डॉ. प्रकाश आंबेडकरांना आव्हान दिले आहे.

Story img Loader