वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येच्या कटात हिंदू भटजींचाही समावेश होता, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. देशात सध्या जुन्या राजांची उदाहरणं देऊन समाजात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण ही खरी वस्तुस्थिती नाही, अशी टीकाही आंबेडकरांनी केली. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संभाजी महाराजांच्या हत्येबद्दल प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “देशात सध्या जुन्या राजांचं उदाहरण देऊन समाजात दुफळी निर्माण केली जात आहे. पण तशी वस्तुस्थिती नाही. त्यांच्या (संभाजी महाराज) हत्येच्या कटात मुघल बादशहाबरोबर भारतातील हिंदू भटजीही होते. हत्येच्या कटात त्यांचाही सहभाग होता, यावर इतिहासकारांनी सविस्तर लिहायला हवं. जेणेकरून देशात पुन्हा कुणी जयचंद कुणी येणार नाही, देशाचं स्वातंत्र जाणार नाही.”

संभाजी महाराजांच्या हत्येत हिंदुंचाही समावेश होता, असं तुम्हाला म्हणायचं आहे का? असं विचारलं असता प्रकाश आंबेडकर म्हणाले, “अर्थ सरळ आहे.”

प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले?

संभाजी महाराजांच्या हत्येवर भाष्य करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “संभाजी महाराज संगमेश्वरावर येथे गुप्त मोहिमेवर होते, असं मानायला हरकत नाही. या मोहिमेची माहिती औरंगाजेबपर्यंत कशी पोहोचली? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. या देशात ज्या राजांचे स्वातंत्र राज्ये होती, ती जयचंदांमुळे अस्ताला गेली. औरंगजेबाने संभाजी महाराजांना ज्याप्रकारे देहदंड दिला, तो निंदनीय आहे. त्याची आम्ही निंदा करतो. पण संभाजी महाराजांना पकडून नेणारेही महत्त्वाचे आहेत.”

हेही वाचा- औरंगजेबाच्या कथित घोषणाबाजीवर ओवैसींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “तुम्ही मुस्लिमांचा…”

प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, “गणोजीराव शिर्के आणि त्यांचे वडील पिलाजीराव शिर्के यांचा शिवाजी महाराजांबरोबर एक करारनामा झाला होता. पिलाजीराव शिर्के हे योद्धे होते. महाराजांनी त्यांना कोकणात हरवलं होतं. त्यांच्या नियमाप्रमाणे महाराजांनी त्यांची सर्व जमीन आणि मालमत्ता काढून घेतली. त्यानंतर ते सैनिकांमध्ये सामील झाल्यानंतर त्यांना पगार देण्यात आला. तसेच तुमच्या मुलाला (गणोजी शिर्के) मुलगा झाला तर तुमची जमीन परत दिली जाईल, असा शब्द शिवाजी महाराजांनी पिलाजीराव शिर्केना दिला होता. पण दरम्यानच्या काळात शिवाजी महाराजांचं निधन झालं आणि संभाजी महाराज सत्तेवर आले.”

“संभाजीमहाराज हा करारनामा पाळतील, असा विश्वास गणोजी शिर्के यांना वाटला नाही. इतिहासकार म्हणातात, संभाजी महाराज ५०० सैनिकांबरोबर संगमेश्वर येथे आहेत. ही बातमी रंगनाथ स्वामी यांनी औरंगजेबापर्यंत पोहोचवली. त्यानंतर औरंगजेबाने आपल्या फौजा पाठवून संभाजी महाराजांना कैद केलं. भारतात जेव्हा मुस्लीम राजे आले. त्यांनी कत्तली निश्चितपणे केल्या. पण संभाजी महाराजांची हत्या ज्याप्रकारे करण्यात आली, ती पद्धत सुफी किंवा मुस्लीम धर्माला मान्य नाही,” असं आंबेडकरांनी नमूद केलं.

हेही वाचा- “ओवैसींनी मर्यादेत राहावं, ती मर्यादा…”, उद्धव ठाकरेंचा उल्लेख करत नवनीत राणांचा इशारा

प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, “नाशिकमध्ये कडू नावाचे लेखक आणि प्राध्यापक आहेत, त्याचं औरंगजेब आणि मनुवाद हत्या संदर्भात एक पुस्तक आहे. त्यामध्ये त्यांनी उल्लेख केला आहे की, औरंगजेबाच्या सल्लागार समितीमध्ये हिंदू कायद्याच्या संदर्भात सल्ला देणारे आबा भटजी होते. त्यांनीच संभाजी महाराजांना शिक्षा कशी द्यावी? हे सुचवलं होतं, असा इतिहासात उल्लेख आहे. मनुस्मृतीप्रमाणे संभाजीमहाराजांना शिक्षा देण्यात यावी, असा सल्ला भटजींनी दिला होता. महाराजांना शिक्षा देताना भटजींचा सल्ला अमलात आणला, असा आरोप आहे, असं मी मानतो.”

“त्यामुळे भारताच्या इतिहासात जे-जे लोक स्वतंत्र राज्य निर्माण करायला निघाले होते. अशा राज्यात जयचंद निर्माण झाले. या जयचंदानी स्वतंत्र राज्यं संपवली. त्यामुळे आपण औरंगाजेबाचा जेवढा निषेध करतो, तेवढा निषेध या जयचंदांचाही करायला हवा. संभाजीमहाराजांना पकडण्यात गणोजी शिर्के यांचा हात होता, हे सरळ दिसतंय. संभाजी महाराजांना मनुस्मृतीप्रमाणे शिक्षा झाली पाहिजे, हा सल्ला आबा भटजी यांनी दिला. या दोघांचा निषेध न करता आणि थेट औरंगजेबाचा निषेध करतो, हे वस्तुस्थितीला धरून नाही. भारताच्या इतिहासात असे जयचंद अनेकदा निर्माण झाले, येथून पुढे असे जयचंद निर्माण होणार नाहीत, याची दक्षता आपण घ्यायला हवी. या जयचंदाचाही निषेध केला पाहिजे,” अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prakash ambedkar statement on hindu bhataji was involved in sambhaji maharaj murder with mughals aurangazeb rmm
Show comments