Prakash Ambedkar Latest News: महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाचा विषय तापू लागला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यामुळे थेट निवडणुकीत उतरण्याचा इशारा दिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील हे सातत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आक्रमक टीका करताना दिसत आहेत. फडणवीसांकडूनही त्यावर स्पष्ट भूमिका मांडली जात आहे. मात्र, मराठा आरक्षणावरून या दोघांमध्ये चालू असणाऱ्या वादावर आता प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे. तसेच, या भांडणामागे ओबीसींना फसवण्याचा हेतू असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षणाचा लाभ मिळावा, या आपल्या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. मात्र, राज्यातील ओबीसी नेते व ओबीसी समाजाकडून याला तीव्र विरोध दर्शवण्यात आला आहे. लक्ष्मण हाकेंनी यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्याप्रमाणेच उपोषणाचं हत्यारही उपसलं होतं. या पार्श्वभूमीवर राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न जटिल झालेला असताना कोणत्याही राजकीय पक्षाकडून यावर स्पष्ट भूमिका मांडली जात नसल्याचं दिसून येत आहे. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिलं जावं की नाही? याबाबत सर्वच पक्षांकडून चर्चेचं आवाहन केलं जात असताना प्रकाश आंबेडकरांनी केलेला दावा चर्चेचा विषय ठरला आहे.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

प्रकाश आंबेडकरांनी शनिवारी संध्याकाळी उशीरा सोलापुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर त्यांची भूमिका मांडली. राज्यातील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रकाश आंबेडकरांनी गेल्या काही दिवसांक आक्रमक भूमिका घेतली आहे. यासंदर्भात त्यांना विचारणा केली असता इतर राजकीय पक्ष ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण दिलं जावं की नाही? यावर स्पष्ट भूमिका मांडत नसल्याचं त्यांनी नमूद केलं. यात त्यांनी भाजपाप्रमाणेच उद्धव ठाकरे व शरद पवार यांनाही लक्ष्य केलं.

“महाराष्ट्र जळतोय. सत्तेवर येत असताना महाराष्ट्र ज्या कारणांमुळे जळतोय, त्यावर भूमिका न मांडणं चुकीचं आहे. उद्धव ठाकरेंनी भावी पंतप्रदान, भावी मुख्यमंत्री व्हावं. पण या ज्वलंत प्रश्नावर, मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मनोज जरांगेंच्या मागणीवर त्यांनी बोलावं”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षण?

“ओबीसींमध्ये मराठ्यांना घुसवलं जाऊ नये, ही आमची भूमिका आहे. गरीब मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी त्यांना वेगळं ताट दिलं पाहिजे. वेगवेगळ्या निकषांनुसार हे आरक्षण दिलं जाऊ शकतं, त्यात फक्त आर्थिक निकष हा मुद्दा नाही. ते निकष तुम्हाला ठरवावे लागतात”, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

मराठा आरक्षणावरून शरद पवारांन केलं लक्ष्य

दरम्यान, यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शरद पवार यांनाही लक्ष्य केलं. शरद पवारांनी शनिवारी पत्रकार परिषदेत या मुद्द्यावर सगळ्यांना एकत्र घेऊन चर्चा करण्याचं आवाहन राज्य सरकारला केलं. त्यावर प्रकाश आंबेडकरांनी उलट शरद पवार यांनीच भूमिका स्पष्ट करण्याचं आवाहन केलं.

Prakash Ambedkar on Raj Thackeray: “थँक यू व्हेरी मच”, राज ठाकरेंबाबत प्रश्न विचारताच प्रकाश आंबेडकरांची खोचक टिप्पणी; म्हणाले, “आम्ही त्याला…”!

“ही पळवाट आहे. राजकीय पक्ष म्हणून तुम्ही उद्या सत्तेत आलात तर तुम्हाला या स्थितीला उद्या तोंड द्यावं लागेल. तसं असेल, तर जरांगेंच्या मागणीच्या बाजूने तुम्ही आहात की विरोधात हे तुम्हाला स्पष्ट असायला हवं. हे सगळे ओबीसींच्या विरोधात आहेत. म्हणून या पळवाटा काढल्या जात आहेत. तुम्ही राजकीय भूमिका घेतल्यावर लोकांना तुमचा मुद्दा कळतो. त्यामुळेच आमच्याबद्दल ना ओबीसी नाराज आहेत ना मराठे नाराज आहेत”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांवर टीका

दरम्यान, यावेळी प्रकाश आंबेडकरांनी देवेंद्र फडणवीसांनाही लक्ष्य केलं. “देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे यांचं भांडण हे नकली आणि फसवं आहे. जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं आहे. त्यामुळे ओबीसींना असं वाटतंय की जरांगेंच्या विरोधात कोण, तर देवेंद्र फडणवीस. त्यामुळे ‘आपले देवेंद्र फडणवीस’ असा शब्दप्रयोग सुरू झाला आहे. पण देवेंद्र फडणवीस ज्या पक्षाचे आहेत, त्या भारतीय जनता पक्षाकडून यासंदर्भात भूमिकाच घेतली जात नाहीये. त्यामुळे हे नकली भांडण आहे. ते ओबीसींना फसवण्यासाठी ठरवून भांडत आहेत”, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prakash ambedkar targets devendra fadnavis manoj jarange patil on maratha reservation in obc pmw
Show comments