Manoj Jarange On Prakash Ambedkar : राज्यात गेल्या वर्षभरापासून मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन करत आहेत. गेल्या चार-पाच महिन्यांपासून शांत असलेल्या जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आजपासून पुन्हा उपोषण सुरू केले आहे. तसेच बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणीही मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान जरांगे पाटील यांच्या या उपोषणावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार टीका केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आज अमरावती येथे पत्रकार परिषद घेतली होती. यामध्ये त्यांनी मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या बेमुदत उपोषणावर टीका केली होती. प्रकाश आंबेडकर यांच्या या टीकेला आता मनोज जरांगे पाटील यांनीही उत्तर दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आमच्यात वर्चस्वाची लढाई…

प्रकाश आंबेडकर यांना प्रत्युत्तर देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, “सत्ताधारी असो की विरोधक मराठ्यांशिवाय राज्यात कोणाचेही पान हालत नाही. पण, ही आमची हक्काची लढाई आहे, सत्तेची लढाई नाही. यातून आम्ही हक्क मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. आता फडणवीस साहेबांनी मराठ्यांशी बेईमानी, गद्दारी करू नये एवढीच आमची अपेक्षा आहे त्यामुळे आमच्यात वर्चस्वाची लढाई वगैरे काही नाही. समाजासाठी आमचे प्रामाणिक काम चालू आहे आणि ते चालूच राहणार आहे.”

काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर?

अमरावतीमध्ये बोलताना प्रकाश आंबडेकर म्हणाले होते की, “आता धस (आमदार सुरेश धस) विरुद्ध जरांगे पाटील असे सुरू झाले आहे का? की हे दुसरे काही आहे? भाजपाला पुन्हा सत्तेत बसविण्यासाठी शेतकरी जसा दोषी आहे, तसेच मनोज जरांगे पाटीलही दोषी आहेत. जे तुम्हाला मान्य करत नव्हते, त्यानांच मनोज जरांगेंनी सत्तेवर बसवले.”

यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप केला की, “मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. पण त्यांनी भाजपाला कधी लक्ष्य केले नाही. भाजपा एकेकाळी मनोज जरांगेंना मान्यता द्यायला तयार नव्हते, तरीही त्यानांच तुम्ही सत्तेवर बसवले.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prakash ambedkar vanchit bahujan aghadi manoj jarange patil hunger strike marath reservation aam