वंचित बहुजन आघाडीच्या सांगलीमधील सभेत मंचावर महाराष्ट्रातील सर्वच महापुरुषांची प्रतिमा ठेवण्यात आल्या. यात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले यांच्यासह टिपू सुलतान यांचीही प्रतिमा ठेवण्यात आली. या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करताना पोलिसांनी टिपू सुलतान यांच्या प्रतिमेला हार घालू नये, असं प्रकाश आंबेडकरांना सांगितलं. त्यावर आंबेडकरांनी बुधवारी (२९ नोव्हेंबर) वंचितच्या ‘सत्ता संपादन सभेत’ पोलिसांना इशारा दिला.
नेमकं काय घडलं?
वंचित बहुजन आघाडीची सांगलीतील ‘सत्ता संपादन सभा’ सुरू होण्यापूर्वी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर मंचावरील महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना टिपू सुलतान यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करू नये, असे सांगितले. मात्र, प्रकाश आंबेडकर यांनी पोलिसांच्या सूचना फेटाळत टिपू सुलतान यांच्याही प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. तसेच भरसभेत याबाबत सांगत पोलिसांना इशारा दिला.
प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले?
प्रकाश आंबेडकर म्हणाले, “आम्ही आज टिपू सुलतानच्या प्रतिमेला हार घातला. मात्र, काहींनी घालू नका असे सांगितले. तुम्ही टिपू सुलतानच्या प्रतिमेला हार घातला तर बघा, असा इशारा देण्यात आला होता. माझं पोलीस खात्याला माझं आवाहन आहे की, पाच वर्षांनंतर निवडणुका येतात आणि सरकार बदलतं.”
“पोलिसांनी कायद्याप्रमाणे वागायचं आहे”
“आजपर्यंत आम्ही कधीच निवडणुकीच्या माध्यमातून सत्तेत सहभागी होण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र, या निवडणुकीत आम्ही सत्तेत गेल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या. पोलिसांनी घटनेप्रमाणे वागायचं आहे. त्यांनी कायद्याप्रमाणे वागायचं आहे. सरकार जे सांगत आहे तसं वागू नका. सरकारला हे नको आहे तसं तुम्ही करत आहात,” असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं.
“प्रत्येकाने स्वतःबरोबर १० मतदार ठेवा”
“उद्याची सत्ता आपल्याला बदलायची आहे. ही सत्ता बदलण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध रहावं. या सभेला उपस्थित आहेत त्या सर्वांनी असा निश्चिय करा की, मी माझ्याबरोबर १० मतदार ठेवणार आहे. ते १० मतदार या सरकारच्या विरोधात मतदान करतील आणि सत्तापरिवर्तन घडेल,” असं आवाहन आंबेडकरांनी उपस्थितांना केलं.