प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी हा पक्ष महाविकास आघाडीत सहभागी होण्यास इच्छुक आहे. तसेच महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष त्यास अनुकूल आहेत. मविआतला प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेच्या ठाकरे गटाशी वंचितची आधीपासूनच युती आहे. तरीदेखील वंचितच्या महाविकास आघाडीतल्या सहभागाबाबत संभ्रम कायम आहे. अशातच प्रकाश आंबेडकर आणि मविआतील पक्षांमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. वंचितचा कधी काँग्रेसबरोबर, कधी राष्ट्रवादीबरोबर तर कधी ठाकरे गटातील खासदार संजय राऊतांबरोबर संघर्ष पाहायला मिळत आहे. दरम्यान, वंचितने आता शिवसेनेच्या ठाकरे गटाला, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला बाजूला करत थेट आणि केवळ काँग्रेसची चर्चा सुरू केली आहे. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना एक पत्र पाठवलं आहे. या पत्रात त्यांनी काँग्रेसला नवीन प्रस्ताव दिला आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी खरगे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे की, मी महाराष्ट्रातील ७ जागांवर वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेसला पूर्ण पाठिंबा देण्याचं ठरवलं आहे. महाविकास आघाडीत काँग्रेसला मिळणाऱ्या कोणत्याही ७ मतदारसंघांची नावं मी खरगे यांच्याकडे मागितली आहेत. काँग्रेसने निवडलेल्या त्या सात जागांवर वंचित बहुजन आघाडी काँग्रेसला पूर्ण पाठिंबा देईल. आम्ही तिथल्या काँग्रेस उमेदवारांना त्यांच्या मतदारसंघात, मैदानी आणि धोरणात्मक पाठिंबा देऊ. वंचित बहुजन आघाडीकडून काँग्रेससाठी हा आमचा केवळ प्रस्ताव नाही. तर, भविष्यातल्या संभाव्य आघाडीसाठी मित्रत्वाचा विस्तारही आहे.
आंबेडकरांनी त्यांच्या पत्रात लिहिलं आहे की, १७ मर्च रोजी मुबंईत भारत जोडो न्याय यात्रेचा सांगता समारंभ झाला. त्या कार्यक्रमात राहुल गांधींना भेटून आनंद झाला. त्यावेळी आम्ही सविस्तर चर्चा करू शकलो नाही. त्यामुळेच आज मी तुम्हाला पत्र लिहितोय. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. मात्र महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडीला कोणत्याही चर्चेसाठी किंवा बैठकीसाठी निमंत्रित न करता स्वतंत्र बैठका घेत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांनी मविआच्या अनेक बैठकांमध्ये वंचितच्या प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेण्यास नकार दिला आहे. आम्हाला दिलेल्या सावत्र वागणुकीमुळे आमचा त्या दोन्ही पक्षांवरचा विश्वास उडाला आहे.
फॅसिस्ट, फुटीरतावादी, लोकशाही मूल्ये पायदळी तुडवणाऱ्या भाजपा-आरएसएसच्या सरकारला विरोध करणं हेच वंचित बहुजन आघाडीचं प्रमुख धोरण आहे. हाच विचार डोळ्यासमोर ठेवून मी महाराष्ट्रातील ७ जागांवर काँग्रेसला पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मी काँग्रेसला विनंती करतो की, महाविकास आघाडीत काँग्रेसला ज्या जागा मिळतील, त्यापैकी तुमच्या पसंतीच्या सात जागांची यादी आम्हाला द्या. या सात जागांवर वंचित बहुजन आघाडी तुमच्या उमेदवारांना मैदानी आणि धोरणात्मक पाठिंबा देईल.
हे ही वाचा >> “प्रणिती शिंदेंना फोडण्यासाठी भाजपाने…”, सुशीलकुमार शिंदेंचा दावा; म्हणाले, “सोलापूर लोकसभेसाठी…”
मविआचा वंचितला चार जागांचा प्रस्ताव
दुसऱ्या बाजूला, महाविकास आघाडीतले नेते वंचितबाबत सकारात्मक असल्याचं सातत्याने सांगितलं जात आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी नुकतंच सांगितलं आहे की महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडीला राज्यातल्या लोकसभेच्या चार जागा देण्यास तयार आहे. अशातच प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे पवारांना डावलून थेट काँग्रेसशी चर्चा सुरू केली आहे.