विद्यार्थी अभ्यासाच्या ओझ्याखाली दबले जाऊ नयेत, त्यांना खेळ, जीवनकौशल्ये आणि अनुभव शिक्षणासाठी वेळ मिळावा, यासाठी पाठय़क्रम टप्प्याटप्प्याने कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी केली. अभ्यासेतर उपक्रमांनाही मूळ अभ्यासाएवढेच महत्त्व असायला हवे, असेही ते म्हणाले.

मालपाणी फाउंडेशनच्या ध्रुव ग्लोबल स्कूलचे उद्घाटन जावडेकर यांच्या हस्ते नांदे येथे करण्यात आले. या कार्यक्रमात जावडेकर यांनी ही घोषणा केली. गोविंद देवगिरी महाराज, खासदार संजय काकडे, अभिनेता राहुल सोलापूरकर, शाळेचे संचालक डॉ. संजय मालपाणी आणि प्राचार्या संगीता राऊत यांची कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती होती.

जावडेकर म्हणाले, एखादी गोष्ट समजून घेऊन तिचे योग्य विश्लेषण करणे, संवाद साधणे हे खरे शिक्षण आहे. अभ्यासेतर समजल्या जाणाऱ्या अशा कौशल्यांचा विकास विद्यार्थ्यांमध्ये घडावा यासाठी अभ्यासेतर उपक्रमांनाही मूळ अभ्यासाएवढेच महत्त्व असायला हवे. यासाठी वर्गातील पाठय़क्रम टप्प्याटप्प्याने कमी करण्याबाबत सरकार विचाराधीन आहे. सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना आधुनिक विज्ञानाची ओळख होण्यासाठी देशातील तीन हजार शाळांमध्ये ‘अटल टिंकरिंग लॅब’ सुरू करण्यात आल्या आहेत. ‘समग्र शिक्षा’अंतर्गत अकरा लाख शाळांना दरवर्षी क्रीडा साहित्य तसेच ग्रंथालयांसाठीचे साहित्य घेण्यासाठी निधी देण्यात येणार आहे. अभ्यासेतर उपक्रमांची गोडी लावणे हाच या योजनांचा उद्देश आहे.

सीबीएसई शाळांना परवानगी देताना संबंधित शाळेची प्रत्यक्ष कामगिरी तपासली जाणार असल्याचेही जावडेकर यांनी सांगितले. शाळेतील इतर सोयीसुविधांविषयीचे प्रमाणपत्र जिल्हा नियमन अधिकाऱ्यांकडून दिले जाईल. देशातील प्रत्येक विद्यार्थ्यांला उत्तम शिक्षण मिळणे गरजेचे असून त्यासाठी सरकारबरोबरच खासगी क्षेत्राची भूमिकाही महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले.

देशात पहिली ते बारावी या वर्गामध्ये सुमारे सव्वीस कोटी विद्यार्थी शिकतात. त्यातील तेरा कोटी विद्यार्थी सरकारी शाळांमध्ये आहेत, तर दहा कोटी विद्यार्थी खासगी शाळांमध्ये शिकतात. गेल्या वर्षी सरकारी शाळांसाठी घेण्यात आलेल्या ‘स्वच्छ विद्यालय’ या स्पर्धेत अडीच लाख शाळांनी सहभाग घेतला. या वर्षी या स्पर्धेत खासगी शाळांनाही सहभागी करून घेतले जात असून त्यामुळे सहभागी शाळांची संख्या साडेसहा लाख झाल्याची माहिती जावडेकर यांनी दिली.

Story img Loader