अनधिकृत बांधकामप्रकरणी रिपाइंचे नगरसेवक प्रकाश लोंढे यांच्या बाबत आयुक्तांनी ठेवलेला प्रस्ताव शनिवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत फेटाळण्यात आला. पालिकेतील बहुतांश नगरसेवक लोंढे यांच्या पाठीमागे उभे राहिले. लोंढे यांचे नगरसेवकपद अबाधित राखण्याचा निर्णय घेण्यात आला. सातपूर औद्योगिक वसाहतीतील ‘धम्मतीर्थ विहार’ या नावाने झालेल्या अनधिकृत बांधकामाबाबत फ्रावशी अकॅडमीचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते रतन लथ यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार औद्योगिक विकास महामंडळ आणि महापालिकेच्या मदतीने हे बांधकाम हटविले होते. हे बांधकाम नगरसेवक लोंढे यांचे असल्याने त्यांचे नगरसेवकपद रद्द करावे, अशी याचिका लथ यांनी न्यायालयात केली होती. या संदर्भात न्यायालयाचे निर्देश प्राप्त झाल्यानंतर पालिका आयुक्तांनी दोन्ही पक्षांचे म्हणणे जाणून घेतले. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा लेखाजोखा प्रस्तावाच्या माध्यमातून सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला. महापौर अशोक मुर्तडक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत या विषयावर चर्चा झाली. बहुतांश नगरसेवक लोंढे यांच्या पाठीशी उभे राहिले. सातपूर येथील संबंधित जागा एमआयडीसीच्या मालकीची आहे. महापालिकेचा तिथे काही संबंध नव्हता. यामुळे पालिकेने त्या कार्यवाहीत सहभागी होणे चुकीचे होते. यामुळे लोंढे यांच्या अपात्रतेचा काही प्रश्न उद्भवत नसल्याचे काही नगरसेवकांनी सांगितले. अखेर महापौरांनी पालिका आयुक्तांनी सादर केलेला प्रस्ताव फेटाळत लोंढे यांचे नगरसेवक कायम ठेवण्याचा निर्णय जाहीर केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा