राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या बहीण पंकजा मुंडे यांच्याशी असणाऱ्या नात्यात दुरावा आल्याची कबुली दिली होती. आमचं नातं आता बहीण भावाचं राहिलेलं नाही. आम्ही राजकारणात एकमेकांचे वैरी आहोत, असे त्यांनी सांगितलं होते. त्यांच्या या वक्तव्याचा मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी समाचार घेत धनंजय मुंडेंवर टीका केली आहे.
प्रकाश महाजन ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलत होते. “धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचं नातं संपायला नाही पाहिजे. पंकजा मुंडेंनी नातं संपलं, असं जाहीर केलं नाही. राजकीय लढाई वेगळी असते. २०१९ साली बीडमध्ये धनंजय मुंडे आपल्या बहिणीबाबत काय काय बोलले हे आठवा. धनंजय मुंडेंना गोपींनाथ मुंडे आणि प्रकाश महाजनांमुळे ओळख मिळाली,” असेही प्रकाश महाजन यांनी म्हटलं.
हेही वाचा – मुंडे बहीण-भावाच्या नात्यात दुरावा? धनंजय मुंडेंनी दिली जाहीर कबुली, म्हणाले “पंकजा आणि माझं नातं आता…”
“पत्नीच्या कारमध्ये बंदूक ठेवून अटक…”
“धनंजय मुंडेंना ज्या स्त्रीपासून दोन मुले आहेत, तिला कशी वागणूक दिली. परळीत आल्यावर आपल्या पत्नीच्या कारमध्ये बंदूक ठेवून अटक करण्यास सांगतो. त्यांच्या दृष्टीने नात्याला काही किंमत नसते, अशी काही लोक असतात. पण, नाते जोपासले पाहिजे,” असेही प्रकाश महाजन म्हणाले.
हेही वाचा – “…तर मोदीही मला संपवू शकत नाहीत”, पंकजा मुंडेंच्या बीडमधील वक्तव्यानंतर चर्चांना उधाण
“जिथे स्वार्थ आडवा येतो…”
“पंकजा मुंडेंच्या आईस गॉड मदर म्हणणारे धनंजय मुंडे तिच्याबाबत, असं कसे बोलू शकतात. नात्यात ऐवढी टोकाची भूमिका घेण्याची गरज नाही. नात जोपण्यासाठी भावना असावी लागते. जिथे स्वार्थ आडवा येतो, संस्कार होत नाही, तिथे अशी वक्तव्य होतात,” असा निशाणा प्रकाश महाजन यांनी धनंजय मुंडेंवर साधला आहे.