राज्य सरकारने आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. कुणबी नोंदी असलेल्या मराठा कुटुंबांना जातप्रमाणपत्रं दिली जाणार आहेत. तसेच त्यांच्या सगेसोयऱ्यांनाही ही प्रमाणपत्रं मिळणार आहेत. यासह मराठा समाजातील लोकांना आता कुणबी जातप्रमाणपत्रांसह ओबीसी आरक्षण मिळेल. याला राज्यातल्या ओबीसी नेत्यांनी कडाडून विरोध केला आहे. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्य सरकारच्या या निर्णयावर आक्षेप नोंदवल्यानंतर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनीदेखील सरकारच्या निर्णयाचा निषेध नोंदवला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रकाश शेंडगे म्हणाले, राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्याने ओबीसी समाजाची मोठी फसवणूक झाली आहे. मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि ठाकरे गटाने आम्हाला शब्द दिला होता की, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. मात्र आता तीन कोटी लोकसंख्या असलेला समाज कुणबी दाखल्यांसह ओबीसीत येणार असेल तर हा ओबीसींच्या आरक्षणाला लागलेला धक्का नाही का? या सरकारने आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यामुळे या सरकारचा निषेध करावा तितका कमी आहे.

ओबीसी नेते म्हणाले, सर्व पक्षाच्या नेत्यांनी आम्हाला सागितलं होतं की, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. देवेंद्र फडणवीस तर म्हणाले होते की, आमचा डीएनए ओबीसी आहे. मग तो डीएनए आता शांत का आहे? तो डीएनए ओबीसींच्या बाजूने का खवळत नाही. सर्व पक्षांचे नेते म्हणाले होते, ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, शरद पवार म्हणाले होते ओबीसींच्या ताटातलं आरक्षण इतर कोणाला देऊ नये. परंतु, आता मराठा समाजाचा ओबीसीत समावेश केल्यानंतर उद्धव ठाकरे, शरद पवार, फडणवीस यांच्या काय भूमिका आहेत?

हे ही वाचा >> “ते गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत”, मनोज जरांगेंच्या मागणीवर फडणवीसांची रोखठोक भूमिका

प्रकाश शेंडगे म्हणाले, राज्यातल्या अनेक पक्षांचे ओबीसी सेल आहेत, ते आता बरखास्त केले जाणार का? त्या ओबीसी सेलमधील नेत्यांना मला प्रश्न विचारायचा आहे की, आता तुमची उघडपणे फसवणूक झाल्यानंतर तुम्ही काय करणार आहात? उलट मी त्यांना आवाहन करतो की, त्यांनी आमच्याबरोबर यावं, ओबीसी चळवळीसाठी काम करावं आणि ओबीसींच्या हक्कांचं संरक्षण करावं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prakash shendge slams devendra fadnavis over obc dna maratha reservation manoj jarange asc