मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांचं आंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण सुरू आहे. दुसरीकडे आरक्षणाची मागणी घेऊन अनेक ठिकाणी मराठा आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. राज्यात जाळपोळीच्या घटना घडत आहेत. बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दोन दिवसांपूर्वी दगडफेक झाली. तसेच त्यांच्या घराबाहेर वाहनांना आग लावण्यात आली. त्यानंतर आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घराला आणि जयदत्त क्षीरसागर यांच्या पक्षकार्यालयाला आग लावल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
आमदार प्रकाश सोळंके यांनी एका कथित फोनकॉलवर मराठा आंदोलनाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे संतप्त जमावाने सोळंके यांच्या घराला लक्ष्य केलं. दरम्यान सोळंके यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हल्ल्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. प्रकाश सोळंके म्हणाले, माझ्या घरावर हल्ला करण्यासाठी आलेल्या जमावामध्ये २०० ते २५० समाजकंटक होते. यात माझे राजकीय विरोधकही होते.
आमदार प्रकाश सोळंके म्हणाले, घर जाळताना हल्लेखोरांचा मला जीवे मारण्याचा कट होता. परंतु, हल्लेखोर माझ्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत. मला मारण्याचा कट कोणत्या लॉजवर, कोणत्या शेतात शिजला, याची माहिती मी पोलिसांना दिली आहे. परंतु, या हल्ल्यावेळी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनीच मला वाचवलं. हल्लेखोरांनी माझ्या तीन गाड्यांसह मला भेटायला आलेल्या लोकांच्याही गाड्या जाळल्या. जमाव घर जाळत असताना पोलीस मात्र बघ्याच्या भूमिकेत होते. माझ्या राजकीय विरोधकांचे कार्यकर्तेदेखील त्या जमावात होते.
हे ही वाचा >> “जाळपोळ करणारे सत्ताधारी पक्षातील लोक, हे थांबवा अन्यथा…”, जरांगे-पाटलांचं विधान
जीवे मारण्याचा कट रचला होता : आमदार सोळंके
आमदार सोळंके म्हणाले, हल्लेखोर ज्या तयारीने आले होते ते पाहून असं वाटतंय की दगडफेक आणि जाळपोळ करण्याबरोबरच माझ्या जीविताला हानी पोहोचवण्याचा त्यांचा हेतू होता. मला मारण्याचा कट रचूनच ते तिथे आले होते. ते घरात घुसले होते. परंतु, मी ज्या ठिकाणी बसलो होतो, तिथपर्यंत ते पोहोचू शकले नाहीत.