बहुजन वंचित आघाडीमध्ये एमआयएमचाही समावेश
भारिप बहुजन महासंघाची काँग्रेसबरोबर आघाडी करण्याची बोलणी चालू असताना दुसरीकडे ‘एमआयएम’ने‘भारिप’सोबत आपली राजकीय सोयरीक जुळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. एमआयएमचे अध्यक्ष अॅड. असुद्दोदीन औवेसी यांनी प्रकाश आंबेडकर यांना पत्र लिहून ‘दलित-मुस्लिम ऐक्या’चे नवे सूत्र विकसित करण्यावर भर दिला आहे. या अनुषंगाने २ ऑक्टोबर रोजी या दोन नेत्यांमध्ये विशेष बैठक होणार असून त्याच दिवशी जाहीर सभेचेही आयोजन करण्यात आले आहे. ‘संविधान वाचविण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी नेतृत्व करावे. आम्ही त्यांच्या समवेत आहोत’ असे सांगत येत्या काळात या आघाडीमुळे राजकीय पटलावरील वातावरण बदलेल, असा दावा एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील आणि माजी आमदार हरिभाऊ भादे यांनी शनिवारी पत्रकार बैठकीत केला.
एमआयएम हा देशाचे संविधान मानणारा पक्ष आहे, असे भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबाद येथे म्हटले होते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर एमआयएमच्या नेत्यांनी आघाडीसाठी हात पुढे केला. या अनुषंगाने दुसऱ्या फळीतील नेत्यांच्या चर्चाही पूर्ण झाल्या आहेत. २ ऑक्टोबर रोजी राजकीय पातळीवर कसे निर्णय होतात हे पाहू. मात्र, आम्ही प्रकाश आंबेडकरांबरोबर आहोत, असे आज सांगण्यात आले. अनुसूचित जाती आणि जमातीच्या समाजाचे नेते म्हणून प्रकाश आंबेडकर यांचे मोठे काम आहे. त्यांना बरोबर घेऊन प्रसंगी छोटय़ा भावाची भूमिकाही बजावायाला तयार असल्याचे आमदार जलील म्हणाले. औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीत औवेसी यांनी आवर्जून अनुसूचित जाती जमातीतील उमेदवार दिले होते. त्यातील काही जण नगरसेवकही झाले. या पाश्र्वभूमीवर पुन्हा एकदा मुस्लीम-दलित ऐक्याचा नारा दिला जाण्याची शक्यता आहे. गांधी जयंतीच्या निमित्ताने विशेष सभा घेऊन प्रकाश आंबेडकर आणि औवेसी त्यांची भूमिका मांडणार आहेत.
काँग्रेसकडे आघाडीत जागावाटपात दबाव राहावा म्हणून प्रकाश आंबेडकरांनी ही खेळी केली असल्याची चर्चा सर्वत्र आहे. या अनुषंगाने विचारले असता आमदार जलील आणि भादे यांच्या वक्तव्यांमध्ये एकवाक्यता होती- ‘सध्या देशात मनुवादी सरकार असून ते संविधान विरोधी काम करत आहे. देशात संविधानाची प्रत जाळली जाते. अशा स्थितीत संविधान वाचवण्याचे काम करणे हे आमचे कर्तव्य आहे.’