सोलापूर : आगामी सोलापूर लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी चर्चेत असलेल्या काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षा, आमदार प्रणिती शिंदे यांचा मागील २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत ज्यांच्यामुळे मतविभागणीचा मोठा फटका बसून आपले वडील सुशीलकुमार शिंदे यांना पराभूत व्हावे लागले, ते वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावरील त्यांचा असलेला राग अजूनही शमला नसल्याचे एका कार्यक्रमातून दिसून आले. आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रकाश आंबेडकर यांचा थेट नामोल्लेख टाळत त्यांचा खरपूस टीका केली.

डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात मातंग एकता आंदोलन आणि सोलापूर शहर युवक काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे स्मृती पुरस्कार आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. त्यावेळी बोलताना त्यांनी प्रकाश आंबेडकर यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले.

हेही वाचा >>>“आज मधूनच हिंदीत का बोलत आहात?” अजित पवारांच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटलांना हसू आवरेना; पण पुढच्याच क्षणी…

त्या म्हणाल्या, दीनदलितांच्या विकासासाठी अनेक शासकीय योजना आहेत. परंतु त्यात तेवढ्याच त्रुटीही असतात. लाभार्थीला योजनेचा लाभ कसा मिळवून द्यायचा नाही, हे प्रशासनाला बारोबर माहीत असते. म्हणून दीनदलितांच्या विकास प्रश्नावर आता कोठेतरी सर्वांनी एकत्र येण्याची वेळ आली आहे. वंचित दीनदलितांचा आवाज म्हणून काँग्रेस पक्षच खंबीर आहे. इतरजण फक्त निवडणुकीतच येतात आणि निघून जातात. शेवटी रक्ताच्या नात्यापेक्षा विश्वासाचे नाते महत्वाचे असते. हे विश्वासाचे नाते टिकविण्याची जास्त आहे. त्याची सुरूवात करू या, अशा शब्दात आमदार प्रणिती शिंदे यांना मातंग समाजाला आपणांस साथ देण्याची हाक दिली.

हेही वाचा >>>सातारा: रिपब्लिकन पार्टीची फार राजकीय चर्चा होत नाही; रामदास आठवलेंची खंत

यावेळी उध्दव ठाकरे शिवसेनेचे माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे आदी उपस्थित होते. मागील २०१९ सालच्या सोलापूर राखीव लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा सलग दुस-यांदा पराभव झाला होता. त्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हेही निवडणूक रिंगणात होते. त्यात मतांची मोठी विभागणी होऊन शिंदे यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. त्याबद्दल शिंदे कुटुंबीयांना प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी राग कायम असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले.

Story img Loader