लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोलापूर : सोलापूर राखीव लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपचा उमेदवार जाहीर झाला नसतानाच काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार मानल्या जाणाऱ्या आमदार प्रणिती शिंदे यांनी मतदारसंघात गावभेटीच्या नावाखाली प्रचार सुरू केला आहे. भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडताना निवडणूक रोख्यांच्या मुद्यावर त्यांनी मोदी सरकारवर आसूड ओढताना करोना लशीच्या मुद्यावर वादग्रस्त विधान केले आहे.

निवडणूक रोखे योजनेत प्रचंड भ्रष्टाचार झाला असून केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजपने हजारो कोटींची वसुली केल्याचा आरोप करीत, आमदार प्रणिती शिंदे यांनी कोव्हिड लस तयार केलेल्या सीरम इन्स्टिट्यूट कंपनीने खरेदी केलेल्या निवडणूक रोख्यांवर भाष्य केले. त्याचवेळी कोव्हिड लशींच्या मात्रा घेतल्यामुळे नंतर लोकांना कोणकोणती दुखणी सुरू झाली, यावर वादग्रस्त भाष्य केले.

आणखी वाचा- उजनी धरणातील पाणीसाठा आणखी खालावतोय; सोलापूरचा पाणीपुरवठा पाच दिवसाआड

त्या म्हणाल्या, मोदी सरकारने उपकृत केलेल्या कंपन्यांपैकी ८० टक्के कंपन्यांनी भाजपला,निवडणूक रोख्यांच्या रूपाने मदत केली. करोना काळात मोदी सरकारने पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट आॕफ इडिया कंपनीने तयार केलेल्या कोव्हिड-१९ लशी खरेदी करून त्याच्या दोन-दोन मात्रा लोकांना बळजबरीने टोचल्या. मात्रा टोचून घेतलेल्या लोकांना पंतप्रधान मोदी यांची छबी असलेले प्रमाणपत्रही दिले. लस खरेदी केल्याची परतफेड म्हणून सीरम कंपनीने शंभर कोटींचे निवडणूक रोखे खरेदी केले. यातून मोदी सरकारने हितसंबंध जोपासल्याचा आरोप आमदार प्रणिती शिंदे यांनी केला. परंतु ही कोव्हिड-१९ मात्रा लोकांचे आयुष्य मारून टाकण्यासाठीच होती की काय, आशी शंका वाटते. कारण ही मात्रा घेतलेल्या असंख्य लोकांना नंतर मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार व अन्य दुखणे सुरू झाले आहेत. त्याचा सार्वत्रिक अनुभव समोर येत असल्याचा दावाही त्यांनी केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Praniti shinde controversial statement on the issue of corona vaccine while criticizing the modi government mrj