सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या लोकसभा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात भाजपाकडून आमदार राम सातपुते हे निवडणुकीच्या मैदानात आहेत. सोलापूर मतदारसंघात दोन्ही उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. आज (ता.२ एप्रिल) प्रणिती शिंदे या मंगळवेढा तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी प्रचाराच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. तसेच खतांच्या बॅगांवर असलेल्या पंतप्रधान मोदी यांच्या फोटोमुळे शेतकऱ्यांना खत विकत घेणे मुश्किल झाल्याचा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला.
प्रणिती शिंदे काय म्हणाल्या?
“मी राजकारणासाठी किंवा सत्तेसाठी राजकारणात आलेली नाही. लोकांचे काम करणे हाच माझा पिंड आहे. भाजपाचे लोक खोट बोलतात. मात्र, माझे इतरांसारखे नाही. खोटे बोलण्याची आपली संस्कृती नाही. मला तुम्ही सेवा करण्याची संधी दिली तर १०० टक्के संधीचे सोने करेल. पण मागच्या दोन्ही खासदारांनी संधीचे सोने केले नाही हे दुर्देव. गेल्या १० वर्षात ज्या युवकांनी मतदान केले, त्यांना वाटले की मोदी है तो मुमकीन है, पण त्यांनी एकाही दमडीचे काम केले नाही”, अशी टीका प्रणिती शिंदे यांनी केली.
हेही वाचा : राहुल गांधींच्या टीकेला पंतप्रधान मोदींचे प्रत्युत्तर; म्हणाले, “चुन चुनके…”
शेतकऱ्यांना खत विकत घेणे मुश्किल
सध्या खतांच्या बॅगांवर पंतप्रधान मोदी यांचे फोटो दिसून येत आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यामुळे शेतकऱ्यांना खत विकत घेताना अडचणी निर्माण होत आहेत. यावर बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या, “गेल्या दहा वर्षांत मोदी सरकारने दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. आता खताच्या बॅगांवरही मोदींचा फोटो आहे. आचारसंहिता लागू होताच शेतकऱ्यांना खत विकत घेणेदेखील मुश्किल झाले आहे. शेतकरी हा या देशाचा कणा आहे, पण त्यांची अशी दयनीय अवस्था पाहून मी तर गप्प बसणार नाही”, असे म्हणत प्रणिती शिंदे यांनी संताप व्यक्त केला.