राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे दोन दिवसांपूर्वीच सोलापूर् दौऱ्यावर होते. यावेळी माध्यमांशी बोलताना सोलापूरमध्ये लोकप्रतिनिधी बदलण्याची गरज असून लोकसभा निवडणुकीत सोलापूरची जागा काँग्रेस लढेल की राष्ट्रवादी याबाबत महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय होईल, असं विधानं त्यांनी केलं. त्यांच्या या विधानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुंपली असून काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनीही रोहित पवारांवर आगपाखड केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “लवकरच काँग्रेसचे १५ आमदार फुटणार”; बच्चू कडूंच्या विधानावर पटोलेंचं प्रत्युत्तर, म्हणाले, “काही हौशे-नवशे…”

काय म्हणाल्या प्रणिती शिंदे?

आमदार प्रणिती शिंदे यांनी आज सोलापूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना रोहित पवारांच्या विधानाबाबत विचारण्यात आलं. यावर बोलताना, रोहित पवार कोण? असा प्रश्न करत त्यांनी रोहित पवारांना सुनावलं. तसेच रोहित पवार अजून मॅच्युअर नाहीत. त्यांची आमदारकीची पहिलीच टर्म आहे, त्यामुळे ते असा पोरकटपणा करतात, अशी टीकाही ही त्यांनी केली.

पुढे बोलताना त्यांनी प्रज्ञा सातव यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबतही प्रतिक्रिया दिली. आमच्या नेत्यांवर वारंवार शाब्दिक आणि आता फिजीकल हल्ले होत आहेत. या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. आज एका महिला आमदारांवर ज्याप्रकारे हल्ला झाला, त्याच्या मागचं कारण पुढे आलं पाहिजे, असे त्या म्हणाल्या. जर एका महिला आमदारावर असे हल्ले होत असतील, तर सामान्य महिलांचं काय होत असेल? असा प्रश्नही त्यांनी विचारला.

हेही वाचा – पिंपरी चिंचवड पोटनिवडणूक : सचिन अहीर यांनी घेतली बंडखोर उमेदवार राहुल कलाटेंची भेट; म्हणाले, “आज…”

यावेळी बोलताना त्यांनी अदाणी प्रकरणावरही भाष्य केलं. राहुल गांधींनी संसदेत बोलताना, तथ्यांच्या आधारे भाषण केलं. त्यामुळे पंतप्रधान मोदी हे स्वत:ला असुरक्षित समजत आहेत. ते सध्या अस्वस्थ आहेत. ज्या प्रमाणे त्यांनी राहुल गांधींच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं, यावरून त्यांच्यावर राहुल गांधींच्या भाषणाचा किती परिणाम झाला आहे, हे कळेल, असे त्या म्हणाल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Praniti shinde reaction on rohit pawar statement regarding solapur loksabha seat spb