काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात अतिरेक्यांनी भारतीय जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनांवर हल्ला केला आहे. पुंछमधल्या थानामंडी भागात हा हल्ला झाला आहे. या हल्ल्यात भारताचे तीन जवान शहीद झाले असून तीन जवान जखमी झाले आहेत. दरम्यान, या हल्ल्यानंतर पुंछ आणि आसपासच्या भागात सशस्त्र दलांकडून सर्च ऑपरेशन हाती घेण्यात आलं आहे. दहशतवाद्यांचे तळ शोधण्यासाठी, त्यांचा एन्काऊंटर करण्यासाठी सैन्यदल आणि स्थानिक पोलीस प्रशासनाने संयुक्त मोहीम सुरू केली आहे. संसदेतल्या घुसखोरीचं प्रकरण ताजं असतानाच काश्मीरमधील या दहशतवादी हल्ल्यानंतर देशाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे विरोध पक्ष देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनीदेखील याच मुद्द्यावरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, देशात कुठेही दहशतवादी हल्ल्यांमध्ये किंवा नक्षलवादी हल्ल्यांमध्ये शहीद झालेल्या जवानांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कधी श्रद्धांजही वाहिली आहे का? तुम्ही कधी संसदेत मोदी यांना आपल्या शहीद जवानांना श्रद्धांजली वाहताना पाहिलं आहे का? आपले जवान, आपल्यासाठी लढतात, प्रसंगी प्राण अर्पण करतात, परंतु मोदींनी त्यांना कधीच श्रद्धांजली वाहिली नाही. मोदी नेहमी विमानात बसून आकाशातून टाटा-बायबाय करताना दिसतात. ते कोणाला टाटा करतात ते कधी आम्हाला समजलंच नाही. पंतप्रधान मोदी हे केवळ स्वतःची प्रसिद्धी करण्याचं काम करत असतात. ही खूप गंभीर बाब आहे आणि आम्हाला त्याचा खुलासा हवा आहे.
हे ही वाचा >> “मराठ्यांचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला तर…”, मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा; म्हणाले, “करोनाच्या नावाखाली…”
आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, मोदी सत्ता मिळवण्यासाठी काहीही करतील, कोणतंही कांड करतील. देशात सध्या अराजकता माजली आहे. फक्त एकाच माणसामुळे अराजकता वाढू लागली आहे. आपला देश ज्या दिशेने चालला आहे ते पाहून मला खूप भिती वाटते. कारण भारतात कधीही जात-धर्म पाहून मतदान झालेलं नाही. परंतु, मोदी लोकांना तसं करण्यासाठी भाग पाडत आहेत. ते जर सत्तेसाठी कांड करत असतील, षडयंत्र रचत असतील तर त्याविरोधात आपण सर्वांनी एकत्र येऊन लढण्याची आवश्यकता आहे.