तालुक्यातील सिद्धेश्वरवाडी शिवारातील विहिरीत आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून, प्रसाद तुकाराम चोरे (वय २०, रा. डोंगरगण, टाकळीहाजी, ता. शिरूर, जिल्हा पुणे) असे मृत तरुणाचे नाव आहे. प्रसाद हा शिक्षणशास्त्र पदविकेच्या दुस-या वर्षांत शिक्षण घेत होता. शिक्षणाबरोबरच पॅनकार्ड क्लबचेही तो काम करीत होता. या व्यवसायातील तसेच इतर विविध कारणांचा शोध घेऊन प्रसाद याने आत्महत्या केली की त्याचा कोणी घातपात केला हे कोडे उलगडण्याचा पोलीस प्रयत्न करीत आहेत.
     प्रसाद हा शिक्षणशास्त्र पदविकेच्या दुस-या वर्षांत शिक्षण घेत असला तरी गेल्या काही महिन्यांपासून तो महाविद्यालयात जात नव्हता. घरीच आईवडिलांना शेतीत मदत करीत होता. शेतीतील कामाबरोबरच तो पॅनकार्ड क्लबचेही काम करीत होता. २४ ऑक्टोबर रोजी दिवाळी पाडव्याच्या दिवशी सायंकाळी सात वाजता पॅनकार्ड क्लबची पॉलिसी देऊन येतो असे सांगून दुचाकी (क्रमांक एम. एच. १२, सीएस ३३१६) घेऊन तो घराबाहेर पडला. तो रात्री परतलाच नाही. त्यानंतर दुस-या दिवशी त्याच्या नातलगांनी त्याची शोधाशोध सुरू केली. प्रसाद याच्याकडे असलेल्या दोन्ही मोबाइल नंबरवर त्याचे नातलग वारंवार फोन लावत होते. परंतु दोन्हीही नंबर बंद होते. अखेर टाकळीहाजी, ता. शिरूर पोलीस ठाण्यात त्याच्या नातलगांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.
    सोमवारी तालुक्यातील सिद्धेश्वरवाडी येथे उपसरपंच पांडुरंग चत्तर हे आपल्या शेतात कांद्याला पाणी देत होते. हे काम करीत असताना शेजारचे शेतकरी लहानू गुलाब कावरे यांच्या विहिरीस किती पाणी आहे हे पाहण्यासाठी त्यांनी विहिरीत डोकावले असता त्यांना पाण्यावर एका तरुणाचा मृतदेह तरंगताना दिसला. उपसरपंच चत्तर यांनी त्याबाबत पारनेर पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाण्यातील मृतदेह विहिरीबाहेर काढला. या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आल्यानंतर तो नगर येथील शासकीय रुग्णालयातील शवागारात ठेवण्यात आला होता.
    पारनेर पोलिसांनी या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून दप्तरी नोंद केली. त्याच वेळी शिरूर पोलीस ठाण्यातून वीसवर्षीय तरुण प्रसाद तुकाराम चोरे हा डोंगरगण, टाकळीहाजी येथून शुक्रवारपासून बेपत्ता असल्याची माहिती पारनेर पोलिसांकडे आली होती. या माहितीतील वर्णन मृत तरुणाशी मिळतेजुळते असल्याने पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद जांभळे यांनी तातडीने शिरूर पोलिसांशी संपर्क करून त्याबाबत माहिती दिली.
    शिरूर पोलिसांनी बेपत्ता तरुणाच्या नातेवाइकांना माहिती दिल्यानंतर तरुणाचे नातेवाईक पारनेर पोलीस ठाण्यात आले. त्यांना मृतदेहाच्या अंगावरील कपडे दाखविण्यात आल्यानंतर त्यांनी ते कपडे प्रसाद याचेच असल्याचे ओळखले. पारनेर पोलीस या नातेवाइकांना घेऊन नगर येथे गेले. तेथे शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून ठेवण्यात आलेला मृतदेह त्यांना दाखवण्यात आल्यानंतर तो प्रसाद याचाच असल्याची त्यांची खात्री पटली. त्यानंतर प्रसाद याच्या नातेवाइकांकडे बुधवारी दुपारी हा मृतदेह सुपूर्द करण्यात आला. दरम्यान, पारनेर पोलिसांनी प्रसाद याच्या नातेवाइकांकडे प्राथमिक चौकशी केली असता प्रसाद हा अतिशय शांत व गुणी तरुण होता, त्याचे कोणाशी भांडण नव्हते वा घरातील कोणी त्यास रागावले नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. प्रसाद याच्या नातेवाइकांकडून विशेष माहिती मिळत नसल्याने पोलीस पॅनकार्ड पॉलिसी व्यवसाय तसेच त्याच्या महाविद्यालयाकडून काही माहिती उपलब्ध होते काय याची चाचपणी करू लागले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा