जालन्यातील आंरतवाली सराटी येथे झालेल्या मराठा समाजाच्या सभेत मनोज जरांगे-पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं. पंतप्रधानांनी फडणवीसांना समज द्यावी. कारण, ते छोटे कार्यकर्ते अंगावर घालत आहेत, असं जरांगे-पाटील म्हणाले. याला भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. बोलवता धनी, तुमच्याकडून काम करून घेत आहे. तुम्ही देवेंद्र फडणवीसांवर टीका करत आहात, हे न शोभणारं कृत्य आहे, अशा शब्दांत लाड यांनी जरांगे-पाटलांना खडसावलं आहे.
“मराठा आरक्षणावरून वेगळा रंग देण्याचा प्रयत्न होत आहे. मराठा समाजानं याचा विचार करण्याची गरज आहे. मराठा आंदोलनात आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी काम केलं. २०१८ साली देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम केलं. उच्च न्यायालयात आरक्षण टिकलं. पण, उद्धव ठाकरेंचं सरकार आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात अडीच वर्षे पाठपुरावा करण्यात आला नाही. त्यामुळे आरक्षण रद्द झालं,” असा आरोप प्रसाद लाड यांनी केला.
हेही वाचा : “देवेंद्र फडणवीसांची राष्ट्रवादीबरोबर जाण्याची इच्छा नसेल, पण…”, बच्चू कडूंचा टोला
“गर्दी मराठा समाजाला नवीन नाही”
“जरांगे-पाटील समाजासाठी काम करतात हे मान्य आहे. पण, ज्या पद्धतीनं तुम्हाला चालवलं जातंय, त्याचा निषेध करतो. जरांगे-पाटलांना ओबीसीतून आरक्षण हवं आहे. पण, आम्हाला देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं मराठा आरक्षण १०० टक्के हवं आहे. गर्दी मराठा समाजाला नवीन नाही. ५० हून अधिक मोर्चे काढल्यानंतरही मराठा समाजानं गर्दी केली होती. या समाजाच्या भावना आहेत. ही कुठल्याही नेतृत्वाच्या मागची गर्दी नाही. तर मराठा आरक्षणासाठीची गर्दी आहे,” असं प्रसाद लाड म्हणाले.
“…त्यानंतही मराठा मुख्यमंत्र्यांनी आरक्षण दिलं नाही”
“बोलवता धनी, तुमच्याकडून काम करून घेत आहे. तुम्ही देवेंद्र फडणवीसांवर टीका करत आहात, हे न शोभणारं कृत्य आहे. शरद पवार ४ वेळा, विलासराव देशमुख ९ वर्षे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, शंकरराव चव्हाण आणि बाबासाहेब भोसले यांनी एवढे वर्षे मुख्यमंत्रीपद भूषावलं. पण, १९८३ साली अण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षणाची मागणी केली आणि स्वत:चा देह त्यागला. त्यानंतही मराठा मुख्यमंत्र्यांनी आरक्षण दिलं नाही,” असं प्रसाद लाड यांनी सांगितलं.
हेही वाचा : “नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पाकिस्तानी खेळांडूवर भाजपाकडून फुलांचा वर्षांव, मग…”, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
“आम्हाला ओबीसी आणि एनटीमध्ये आरक्षण नको”
“५० वर्षांच्या इतिहासानंतर एका ब्राह्मण मुख्यमंत्र्यानं मराठा समाजाला आरक्षण दिलं. मराठ्यांना १०० टक्के आरक्षण हवं आहे. आम्हाला ओबीसी आणि एनटीमध्ये आरक्षण नको. शिंदे-फडणवीस आणि अजित पवारांच्या नेतृत्वात राज्य सरकार मराठ्यांना १०० टक्के आरक्षण देईल. मराठा समाजात फूट पाडण्याचं काम मोगलांनी केलं. ते काम काँग्रेस आणि शरद पवारांच्या नेतृत्वात जरांगे-पाटलांनी करू नये,” असं आवाहन प्रसाद लाड यांनी केलं.