मागील काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त टिप्पणी केली. त्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनीदेखील शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले. पर्यटनमंत्री तथा भाजपाचे नेते मंगलप्रभात लोढा यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्रा सुटकेशी केली. या सर्व टीका-विधानांमुळे राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. असे असतानाच आता राष्ट्रवादीने समाजमाध्यमांवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांनी भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे, असे विधान केल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादीने ट्वीट केलेल्या या व्हिडीओमुळे राज्यात नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीने ट्वीट केलेल्या व्हिडीओमध्ये नेमके काय आहे?
राष्ट्रवादीने ट्वीट केलेल्या व्हिडीओमध्ये प्रसाद लाड बोलताना दिसत आहेत. ‘संपूर्ण भारताचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला. त्यानंतर रायगडावर त्यांचं बालपण गेलं. रायगडावर त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली. त्यामुळे सुरुवात कोकणात झाली,’ असे विधान प्रसाद लाड करताना दिसत आहेत. याच विधानाचा आधार घेत राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. ‘भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे असे विधान केले. दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या. शिवाजी महाराज यांच्या नावे निवडणूक लढवतात. परंतु महाराजांचा इतिहासाच यांना माहीत नाही. त्यांच्या चुका उपस्थित पत्रकार सुधारत आहेत. ही खूप लाजिरवाणी बाब आहे,’ असा टोला राष्ट्रवादीने लगावला आहे.
भाजपाने नाक रगडून प्रायश्चित्त करावे- अमोल मिटकरी
प्रसाद लाड यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपावर टीका केली आहे. “सकाळ झाली भाजपाचे लोक एक बेताल व्यक्तव्य करत आहेत. प्रसाद लाड यांनी नवा जावई शोध लावला आहे. शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्यावर झाला. शिवरायांची राजधानी रायगड होती, असे आम्ही वाचत आलो आहोत. मात्र लाड म्हणत आहेत की शिवरायांचा जन्म कोकणात झाला. विशेष म्हणजे ते स्क्रीप्ट वाजून असे सांगत आहेत. म्हणजे उद्या गुजरात महोत्सव घ्यायचा असेल तर गुजरातच्या लोकांना खुश करण्यासाठी ते शिवरायांचा जन्म गुजरातच्या सुरतमध्ये झाला, असे म्हणतील. हे अत्यंत चुकीचे आहे. याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मूक समर्थन कारणीभूत आहे. यांना पळता भुई थोडी होईल. यांनी आता फक्त माफी मगू नये तर नाग रगडून प्रायश्चित्त करावे,” अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली.