मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेलं विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भोवलं आहे. नारायण राणे यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. या अटकेपूर्वी रत्नागिरी सत्र न्यायालयाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. मात्र हा अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तिथेही योग्य ती प्रक्रिया पार पाडून याचिका करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने नारायण राणे यांच्या वकिलांना दिले होते. त्यामुळे तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. त्यानंतर नारायण राणेंच्या अटकेचा मार्ग मोकळा झाल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली. मात्र ही अटक झाल्यानंतर भाजपाचे नेते प्रसाद लाड यांनी अनेक गंभीर आरोप केले असून राणेंच्या जीवाला धोका असल्याची भाजपाला भीती वाटत आहे असं लाड म्हणालेत.
राणे यांना अटक केल्यानंतर त्यांचे पुत्र निलेश राणे आणि प्रसाद लाड यांची पोलिसांसोबत पोलीस स्थानकामध्येच बाचाबाची झाली. कुठल्या गुन्ह्याखाली अटक केलीय हे जाणून घेण्याचा हक्क आहे की नाही, असा प्रश्न निलेश राणे यांनी पोलिसांना विचारला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना लाड यांनी, “एसपी बोलायला तयार नाहीयत. दरवाजा बंद करुन बसलेत. आम्हाला अशी भीती आहे की राणेंच्या जीवाला धोका आहे. राणेंना असच ताटकळत ठेऊन त्यांना न्यायालयासमोर न नेता त्यांना अटक करुन रात्री त्यांचा छळकरायचा हा देखील या सरकारचा प्रयत्न असू शकतो,” असं म्हटलं आहे.
तसेच पुढे बोलताना लाड यांनी, “मला कोणीतरी सांगितलं की एका मंत्र्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्याने एसपींवर दबाव टाकला आणि सांगितलं की काहीही करा आणि अटक करा. राजकीय लढाई राजकारण्यांनी लढली पाहिजे. विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे. तत्वाची तत्वाने, न्यायाने न्यायाची लढाई लढली पाहिजे. भाजपाचा कोणताही कार्यकर्ता चुकीच्या पद्धतीने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसोबत वागत नव्हता. शिवसेनेने निषेध केला मात्र आम्ही जनादेश यात्रा सुरु ठेवलेली,” असंही म्हटलं आहे.
याच प्रमाणे पत्रकारांनी आरोग्यासंदर्भातील कारण अटक टाळण्यासाठी देण्यात आलं का असा प्रश्न लाड यांना विचारला. त्यावर उत्तर देताना, “मेडिकलचं कारण पुढे केलेलं नाही. त्यांचं वय ७० आहे. राज्यातील एका ज्येष्ठ नागरिकाला अशी वागणूक मिळणार असेल तर ते निंदनीय आहे. राज्य कुठल्या स्थरावर जातंय याचाही विचार करावा लागेल,” असं लाड म्हणाले.