Prashant Koratkar Case Hearing in Kolhapur Court : छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये करणारा आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर याला सोमवारी (२४ मार्च) तेलंगणात अटक करण्यात आली. आज पोलिसांनी त्याला कोल्हापूर न्यायालयात हजर केलं. कोरटकर प्रकरणाची न्यायालयातील सुनावणी संपली असून काही वेळात न्यायमूर्ती निकाल देतील. तत्पूर्वी तक्रारदार इंद्रजीत सावंत यांचे वकील असीम सरोदे यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. न्यायालयात नेमकं काय-काय घडलं याबाबत सरोदे यांनी माहिती दिली.
असीम सरोदे म्हणाले, “आरोपी प्रशांत कोरटकर याला किमान सात दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी आम्ही न्यायालयासमोर केली आहे. न्यायालय या मागणीवर काय निर्णय घेतं ते थोड्याच वेळात आपल्याला समजेल. त्याचबरोर आरोपीला सहकार्य करणाऱ्यांची चौकशी व्हावी, अशी मागणीदेखील आम्ही केली आहे. प्रशांत कोरटकरने म्हटलं आहे की त्याने पोलिसांकडे अर्ज दिलेला, त्यात त्याने म्हटलं होतं की तो आवाजाचे नमुने द्यायला तयार आहे. परंतु, पोलिसांनी मला बोलावलंच नाही. मुळात आरोपी त्याच्या घरी नव्हता, तो त्याच्या पत्त्यावर नव्हता, महाराष्ट्रातून फरार झालेला. असं असताना पोलिसांनी त्याला बोलवायला कुठे जायचं होतं?”
असीम सरोदे काय म्हणाले?
वकील असीम सरोदे म्हणाले, “आरोपी फरार होता आणि आता पोलिसांवर खापर फोडतोय. आम्ही त्याची सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली आहे. ही कोठडी अपूर्ण आहे, मात्र प्राथमिक पातळीवर न्यायालयाने सात दिवसांची कोठडी द्यायला हवी. त्यावर आता न्यायालय काय आदेश देतं ते आपल्याला कळेल. त्याच्या आवाजाचे नमुने तपासायचे आहेत. न्यायालयाने त्याच्या आवाजाच्या नमुन्यांबाबत आज आदेश दिला पाहिजे.”
प्रशांत कोरटकरकडून इंद्रजीत सावंतांवर आरोप
आरोपीच्या वकीलाने इंद्रजीत सावंतांवर आरोप केला आहे की त्यांनी तक्रार करण्याऐवजी व्हॉईस रेकॉर्डिंग व्हायरल केलं. यावर असीम सरोदे म्हणाले, “मुळात आपण काहीतरी बोलायचं आणि दुसऱ्यावर आरोप करायचे असा प्रकार आरोपीकडून चालू आहे. त्याचा एक सहकारी पोलिसांना सापडला आहे. त्याव्यतिरिक्त त्याला कोणी-कोणी मदत केली? तो कुठे राहिला? त्याला आश्रय कोणी दिला? पळून जायला कोणी मदत केली? कोणाचं वाहन घेऊन तो पळून गेला? त्याच्या वक्तव्याने महाराष्ट्र व्यथित झालेला असताना तो कुठे मजा करत फिरत होता? याबाबत तपास व्हायला हवा. काहीजण म्हणत आहेत की तो चंद्रपूर येथे पोलीस मुख्यालयासमोर एका इमारतीत राहत होता. तिथलं सीसीटीव्ही फूटेज तपासलं पाहिजे.”