Prashant Koratkar Case Hearing in Kolhapur Court : छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये करणारा आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणारा प्रशांत कोरटकर महिनाभरापासून तेलंगणात लपून बसला होता. महाराष्ट्र पोलिसांनी सोमवारी (२४ मार्च) तेलंगणात त्याला अटक करून कोल्हापुरात आणलं. आज पोलिसांनी त्याला कोल्हापूर न्यायालयात हजर केलं. यावेळी वकील असीम सरोदे आणि सरकारी वकिलांनी न्यायालयात इंद्रजीत सावंत यांची बाजू मांडली. तर अॅड. घाग यांनी कोरटकरची बाजू मांडली. ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायालयात हजर होते.
दरम्यान, कोरटकर प्रकरणाची न्यायालयातील सुनावणी संपली असून काही वेळात न्यायमूर्ती निकाल देतील. तत्पूर्वी असीम सरोदे यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. न्यायालयात नेमकं काय-काय घडलं याबाबत सरोदे यांनी माहिती दिली.
असीम सरोदे यांनी मांडलेले मुद्दे
आरोपीला सहकार्य करणाऱ्यांची चौकशी व्हावी
आरोपीची सात दिवसांची पोलीस कोठडी मिळावी
राजमाता जिजाऊंबद्दल त्याने आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे त्याच्यावर कडक कारवाई व्हावी
सरकारी वकिलांनी मांडलेले मुद्दे
आरोपीने मोबाइल डेटा का डिलीट केला? त्यामागील कारणांचा तपास व्हावा
आरोपीच्या आवाजाचे नमुने घ्यावे लागतील.
आरोपीला महिन्याभरात कोणी मदत केली याचा तपास गरजेचा आहे.
आरोपी प्रशांत कोरटकर याने पळून जाण्यासाठी कोणतं वाहन वापरलं, त्या वाहनाचा मालक कोण हे समोर यायला हवं.
आरोपी म्हणाला आहे की तो ऑडिओ क्लिपमधील आवाज माझा नाही, त्यामुळे आरोपीच्या आवाजाचे नमुने घ्यावे लागतील.
आरोपी प्रशांत कोरटकरच्या वकिलांनी मांडलेले मुद्दे
तक्रारदाराने जाणीवपूर्वक व्हिडीओ व ऑडिओ व्हायरल केले
तक्रारदाराने आधी ऑडिओ व्हायरल केला त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता तक्रार दाखल केली.
तक्रारदाराने आधीच पोलिसांत जाऊन तक्रार द्यायला हवी होती
तक्रारदाराचा हेतू तपासावा
आरोपीला अटकेआधी पोलिसांनी नोटीस द्यायला हवी होती
प्रशांत कोरटकरच्या वकिलानी केलेल्या दाव्यांवर असीम सरोदे यांची भूमिका
आरोपीची वक्तव्ये ऐकून माझे आशील व्यथित झाले होते. ते अनेक तास झोपू शकले नाहीत. राजमाता जिजाऊंबद्दल, त्यांच्या चारित्र्याबद्दल प्रशांत कोरटकर याने केलेली वक्तव्ये ऐकून त्यांना प्रचंड त्रास झाला. त्यामुळे त्यांनी त्यांचं दुःख लोकांच्या न्यायालयात मांडलं. त्यांनी ऑडिओ क्लिप समाजमाध्यमांवर शेअर केली. लोकांच्या न्यायालयाला हे सगळं माहिती झालं पाहिजे अशी त्यांची भूमिका होती. तसेच वाईट चेहरे लोकांसमोर आले पाहिजेत असं त्यांना वाटत होतं.
“माझ्या फोनमधील डेटा कशासाठी हवा”, कोरटकरचा न्यायालयासमोर प्रश्न
इंद्रजीत सावंतांच्या वकीलांनी सांगितल, आरोपी न्यायलयासमोर म्हणाला की माझ्या फोवरून इंद्रजीत सावंत यांना फोन गेला होता हे सिद्ध झाला आहे तर मग आता माझ्या फोनमधील उर्वरित डेटा तुम्हाला कशाला हवा आहे? त्यावर आम्ही म्हणाले, मोबाइल हे गुन्हा घडण्याचं, धमकीचं माध्यम असेल तर कोरटकरने आधी कोणाला फोन केला होता? सावंतांना धमकावल्यानंतर त्याने कोणाला फोन केला? त्याला मदत करणारे लोक कोण? हे देखील सिद्ध व्हायला हवं. त्याचे साथीदार कोण आहेत? त्याच्या या गुन्ह्यात इतर कोण कोण सहभागी आहेत? त्याला कोणाचं पाठबळ आहे? हे देखील सिद्ध व्हायला हवं.