Prashant Koratkar Case : छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊसाहेब व छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणे, समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणे, इतिहासकार इंद्रजीत सावंतांना धमकावणे या प्रकरणांतील आरोपी प्रशांत कोरटकर याने कोल्हापूर सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. यावर आज सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी काय-काय घडलं याबाबतची माहिती इंद्रजीत सावंत यांचे वकील असीम सरोदे यांनी दिली आहे. सरोदे म्हणाले, “न्यायमूर्तींनी दोन्ही बाजूच्या वकिलांचं म्हणणं ऐकून कोरटकरच्या जामीन अर्जावरील निर्णय निकाल राखून ठेवला आहे. न्यायलय दोन दिवसांनी निकाल जाहीर करेल.”
असीम सरोदे म्हणाले, “आरोपी प्रशांत कोरटकर वारंवार विविध न्यायालयात जामीन अर्ज करतोय. आतापर्यंत सर्वच न्यायालयांनी त्याचा जमीन अर्ज फेटाळला आहे. आताही त्याने घाईने जामीन अर्ज केला आहे. आपल्याला जामीन मिळालाच पाहिजे असा दुराग्रह ठेवून त्याने हा अर्ज केला आहे असं दिसतंय. परंतु, या प्रकरणाचा तपास पूर्ण झालेला नाही, असं सरकारी पक्षातर्फे सांगण्यात आलं आहे. पोलिसांनी त्याप्रमाणे न्यायालयाला लेखी कळवलं आहे. कोरटकरला वेगवेगळया राज्यांमघील सहा शहरांत लपलेला असताना अनेकांनी मदत केली होती. त्यांचे जबाब नोंदवणं अद्याप बाकी आहे. त्यामुळे तपास पूर्ण झालेला नसताना त्याला जामीन देणं योग्य नाही अशी मांडणी आम्ही न्यायालयासमोर केली आहे.”
न्यायालयात काय घडलं?
असीम सरोदे म्हणाले, “प्रशांत कोरटकरचा या खटल्यासंदर्भातील इतिहास व घटनाक्रम पाहिला तर त्याच्या गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात येतं. कोरटकरला इंद्रजीत सावंत यांना रात्री १२ व त्यानंतर फोन करावा असं वाटलं. त्याने सावंतांना मध्यरात्री फोन केले. एका अनोळखी व्यक्तीला फोन करायचा, त्याला शिवीगाळ करायची, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊसाहेबांचा अपमान करणे, एका स्त्रीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणे, आक्षेपार्ह वक्तव्ये करणे, ब्राह्मण विरुद्ध मराठा असा नसलेला वाद निर्माण करणे असे अनेक प्रयत्न कोरटकरने केले आहेत. त्याने जातींवर आधारित वक्तव्ये करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याचा फोन रेकॉर्ड करावा लागला.
इंद्रजीत सावंतांनी त्यांच्या कर्तव्याचं वहन केलं : सरोदे
इंद्रजीत सावंतांच्या वकिलांनी सांगितलं की “कोरटकरच्या वकिलांनी न्यायालयासमोर म्हटलं की सावंतांनी न सांगता कोरटकर यांचा कॉल रेकॉर्ड केला, त्यांच्या हेतूवर संशय व्यक्त करत सावंतांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यावर आम्ही म्हटलं की आवश्यकता वाटत असेल तर न्यायालयाने सावंतांविरोधात गुन्हा दाखल करून वेगळा खटला चालवावा, आम्ही तो खटला लढवण्यास तयार आहोत. परंतु, कोरटकर व सावंत यांच्यातील संवाद हा नवरा-बायकोच्या संवादासारखा संरक्षित संवाद नाही. केवळ समाजहितासाठी एक वाईट चेहरा, समाजाबद्दल, समाजातील आदर्श व्यक्तींबद्दल वाईट विचार करणारा माणूस समोर आणणं आवश्यक आहे आणि हे चांगल्या व्यक्तीचं कर्तव्य आहे. सावंतांनी त्यांच्या कर्तव्याचं वहन केलं आहे.