लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षासह महायुतीला फारसं यश मिळवता आलं नाही. ४८ मतदारसंघापैकी महायुतीला फक्त १७ जागा मिळाल्या. त्यामुळे महाराष्ट्रात महायुतीला धक्का बसला. लोकसभा निवडणुकीत नांदेड लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत होता. कारण लोकसभा निवडणुकीआधी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर अशोक चव्हाणांना भाजपाने राज्यसभेवर पाठवलं. त्यामुळे नांदेड लोकसभेची जागा भाजपा मोठ्या मताधिक्यांने जिंकेल अशी चर्चा होती. मात्र, लोकसभा निवडणुकीत भाजपाचे नांदेडचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांचा मोठ्या मताधिक्यांनी पराभव झाला. तर काँग्रेसचे उमेदवार वसंत चव्हाण यांचा विजय झाला. या पराभवाचं कारण आता प्रताप पाटील चिखलीकर यांनी सांगितलं आहे.
प्रताप पाटील चिखलीकर काय म्हणाले?
“मला जनतेने भरभरून मत दिली आहेत. पण मी माझा पराभव झाल्यानंतर देखील सर्वांचे आभार मानतो. नांदेड दक्षिण लोकसभा मतदारसंघातून किंवा कोठून निवडणूक लढवणार? याबाबत पक्षाच्या नेतृत्वाने भूमिका घ्यावी लागते. त्यामुळे पक्षाचे नेतृत्व जे ठरवेन त्या पद्धतीने मी काम करणार आहे”, असं प्रताप पाटील चिखलीकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
अशोक चव्हाणांबाबत चिखलीकर काय म्हणाले?
अशोक चव्हाण भारतीय जनता पार्टीबरोबर आल्यामुळे तुम्हाला काही फायदा झाला का? असा प्रश्न विचारण्यात आला असता चिखलीकर म्हणाले, “अशोक चव्हाण भारतीय जनता पार्टीमध्ये आले. त्यांच्या नेतृत्वात नांदेड लोकसभेची निवडणूक मी लढवली. त्यांनी माझ्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र, संपूर्ण महाराष्ट्रात जो फॅक्टर झाला तोच फॅक्टर नांदेडमध्येही झाला. त्यामुळे माझा पराभव झाला. पाच वर्ष काम करत असताना माझ्याकडूनही काही चुका झाल्या, त्या चुकांची उजळणी करण्याआधी मी कुठे कमी पडलो, याबाबत आत्मपरिक्षण करणार आहे”, असं चिखलीकर यांनी सांगितलं.
प्रताप पाटील चिखलीकर पुढं म्हणाले, “अशोक चव्हाण यांनी पूर्ण जबाबदारी घेऊन काम केलं. मात्र, मनोज जरांगे पाटील यांचा फॅक्टर आणि मुस्लिम समाजांचा फॅक्टर तसेच संविधान बदलाचा जो चुकीचा मेसेज फिरला, त्यामुळे याचा फटका मला या निवडणुकीत बसला. माझ्यासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा मी आभारी आहे”, असे पराभवाचे तीन कारणं प्रताप पाटील चिखलीकर यांनी सांगितली आहेत. दरम्यान, यावेळी लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका दुरुस्त करून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जोमाने काम करणार असल्याचंही यावेळी प्रताप पाटील चिखलीकर यांनी सांगितलं.