राज्यात एकनाथ शिंदेंच्या गटाकडून शिवसेनेतली सर्वात मोठी बंडखोरी होण्याआधी आणि ठाकरे सरकार कोसळण्याच्या आधी प्रताप सरनाईकांवर ईडीनं मोठी कारवाई केली होती. प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या ११.४ कोटींच्या मालमत्तेवर ईडीनं टाच आणण्याची प्रक्रिया सुरू केली होती. मार्च महिन्यात ईडीनं केलेल्या कारवाईमध्ये सरनाईक कुटुंबीयांची ही मालमत्ता प्रोव्हिजनल अर्थात सोप्या भाषेत तात्पुरत्या स्वरुपात ताब्यात घेतली होती, ती मालमत्ता जप्त करण्यासाठी ईडीला हिरवा कंदील मिळाला आहे. त्यामुळे सध्या शिंदे गटासोबत असणारे प्रताप सरनाईक यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

मार्च महिन्यात झाली होती कारवाई

या वर्षी मार्च महिन्यात ईडीकडून सरनाईक यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली होती. प्रताप सरनाईक, त्यांचे पुत्र विहंग आणि पुर्वेश आणि त्यांची कंपनी विहंग ग्रुप यांच्या मालकीची ही सर्व मालमत्ता आहे. यामध्ये ठाण्यातील दोन फ्लॅट आणि एका भूखंडाचा समावेश आहे. मुंबई पोलिसांनी २०१६मध्ये दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे ही कारवाई करण्यात आली होती. या सर्व गैरव्यवहारातून गुंतवणूकदारांचं आर्थिक नुकसान झाल्याचा दावा ईडीनं केला आहे.

प्रताप सरनाईकांना लवादाकडे दाद मागण्याचा अधिकार

दरम्यान, ईडीकडून होणाऱ्या जप्तीच्या कारवाईविरोधात प्रताप सरनाईक यांना लवादाकडे दाद मागण्याचा अधिकार असल्याचंही संबंधित प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

सरनाईकांनी लिहिलं होतं पत्र!

दरम्यान, राज्यात ठाकरे सरकार असताना प्रताप सरनाईकांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ईडीची कारवाई टाळण्यासाठी पुन्हा भाजपाशी हातमिळवणी करण्याचं आवाहन करणारं पत्र लिहिलं होतं. तेव्हा या पत्राची जोरदार चर्चा झाली होती. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडखोरीमध्ये प्रताप सरनाईक शिंदे गटात सामील झाले.

Live Updates
Story img Loader