शिवसेनेचे प्रवक्ते आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं. महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजपासोबत युती करण्याची हाक सरनाईक यांनी दिली आहे. सरनाईक यांचं पत्र समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात याच पत्राची चर्चा सुरू असून, वेगवेगळे तर्कविर्तक लावले जात आहे. सरनाईक यांच्या पत्रानंतर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया आली आहे. शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी सरनाईक यांच्या पत्रावर भूमिका मांडली आहे.
प्रताप सरनाईक यांनी उद्धव ठाकरे यांना दिलेलं पत्र समोर आल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं. या सर्व चर्चांवर बोलताना शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत म्हणाले,”एखाद्या आमदाराने मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहिलं असेल, तर त्यावर प्रतिक्रिया देण्यासारखं काय आहे? ते पत्रं खरं असेल तर त्यात एक मुद्दा आहे. तो तुमच्या माध्यमातूनच मला कळला आहे. महाविकास आघाडीच्या आमदारांना विनाकारण त्रास दिला जात आहे, असं त्या पत्रात म्हटलं आहे. हा गंभीर आरोप आहे. आता विनाकारण त्रास कोण कुणाला देतंय? तो विनाकारण त्रास काय आहे? याचा शोध घेणं गरजेचं आहे,” असं म्हणत संजय राऊत यांनी अप्रत्यक्षरीत्या भाजपासह केंद्रीय तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवरही निशाणा साधला आहे.
हेही वाचा- प्रताप सरनाईक जेलचे पाहुणे होणारच; सरनाईकांच्या ‘लेटरबॉम्ब’नंतर सोमय्यांचा इशारा
सरनाईक यांनी उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रातील दोन महत्त्वाचे मुद्दे…
“साहेब, आमचा तुमच्या नेतृत्वावर अढळ विश्वास आहे. करोना काळात आपण प्रचंड मेहनत घेऊन कुटुंबप्रमुख म्हणून महाराष्ट्र राज्याचा संभाळ केला आहे. त्याबद्दल आपले खरोखर कौतुक करावे तितके कमी आहे. महाराष्ट्र राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री बसविणार हा वंदनीय शिवसेनाप्रमुख माननीय श्री. बाळासाहेबांना दिलेला शब्द व त्यांना दिलेले वचन पूर्ण झालेले आहे. आपण या पदाला न्याय दिला आहे व देत आहात. पण या परिस्थितीतही जे राजकारण सुरु आहे त्यात सत्तेत एकत्र राहून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत असेल, आपला पक्ष कमकुवत करत असेल तर या स्थितीत पुन्हा एकदा आपण पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्याशी जुळवून घेतलेले बरे, असे वैयक्तिक मत आहे. निदान यामुळे प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या आपल्या सहकाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना होणारा नाहक त्रास तरी थांबेल अशी अनेक कार्यकर्त्यांची भावना आहे,” असं सरनाईक यांनी पत्रात म्हटलेलं आहे.
हेही वाचा- महाराष्ट्रात ‘भगव्या’चं राज्य येत आहे…; नितेश राणेंच्या ट्विटने खळबळ
“युद्धात लढत असताना अभिमन्यूसारखे लढण्यापेक्षा किंवा कर्णासारखे बलिदान देण्यापेक्षा, धनुर्धारी अर्जुनासारखे लढावे असे मला वाटते. त्यामुळे राज्यात आपली सत्ता असताना सुद्धा व राज्य शासनाचे किंवा इतर अन्य कुठल्याही नेत्याचे सहकार्य मिळाले नसताना कुणालाही त्रास न देता मी माझी कायदेशीर लढाई माझ्या कुटुंबासह गेले ७ महिने लढत आहे. १२ “पुढील वर्षी मुंबई, ठाणे व अन्य महापालिकांच्या निवडणुका आहेत. आतापर्यंत राज्यात आपली युती तुटली असली, तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. ते अजून तुटण्याआधी जुळवून घेतलेले बरे होईल. तर त्याचा फायदा आमच्या सारख्याकाही कार्यकर्त्यांना व शिवसेनेला भविष्यात होईल, असे मला वाटते. साहेब, आपण योग्य तो निर्णय घ्यालच. माझ्या मनात असलेल्या भावना या पत्राद्वारे कळविल्या आहेत. लहान तोंडी मोठा घास घेतलाय, काही चुकले असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद,” अशा भावना सरनाईक यांनी व्यक्त केल्या आहेत.