Pratap Sarnaik On ST Bus : महायुती सरकारमधील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना राज्यातील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या बस प्रवासात दिलेल्या सवलतींमुळे एसटी तोट्यात असल्याचं मोठं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानामुळे चर्चांना उधाण आलं होतं. त्यामुळे एसटीच्या प्रवासात महिलांना दिली जाणारी ५० टक्के सवलत बंद होणार का? याबाबत चर्चा रंगल्या होत्या. या चर्चांसंदर्भात आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. महिलांना एसटी प्रवासात मिळणारी सवलत बंद होणार नाही. तसेच जेष्ठ नागरिकांना मिळणारी सवलत देखील बंद होणार नसल्याचं स्पष्टीकरण मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलं आहे.

मंत्री प्रताप सरनाईक काय म्हणाले?

“एसटी महामंडळाच्याबाबतीत आणि राज्याच्या हिताच्या अनुषंगाने मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असताना एकनाथ शिंदे यांनी जे काही निर्णय घेतलेले आहेत. त्या निर्णयात कोणताही बदल करण्यात येणार नाही. तसेच ज्या योजना एकनाथ शिंदे यांनी सुरु केलेल्या आहेत त्या योजनेत देखील कोणताही बदल होणार नाही. तसेच एसटीच्या प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय देखील त्यांच्या कार्यकाळात झाला होता. तसेच ७५ वर्षांच्या पुढील जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाचा निर्णय झाला होता. आता या निर्णयात कुठेही बदल होणार नाही”, अशी माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

‘अनेकजण आमच्या पक्षात येतायेत…’

“राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक नेते आमच्या पक्षात येत आहेत. तसेच अजून देखील काही कार्यकर्ते, माजी आमदार, माजी खासदार, विद्यमान आमदार, विद्यमान खासदार जर आमच्या पक्षात येणार असतील तर आम्ही त्यांचं स्वागतच करू. तसेच एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. हे विधानसभेच्या निवडणुकीत जनतेने दाखवून दिलेलं आहे”, असंही मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.

उपमुख्यमंत्री शिंदेंनीही दिलं होतं स्पष्टीकरण

गेल्या काही दिवसांपासून एसटीच्या प्रवासात महिलांना दिली जाणारी ५० टक्के सवलत बंद होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र, या चर्चांवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही काही दिवसांपूर्वी स्पष्टीकरण दिलं होतं. एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. तसेच त्याचबरोबर एसटी बसच्या प्रवासात लाडक्या बहि‍णींना देण्यात आलेली ५० टक्के सवलत बंद होणार नाही. तसेच जेष्ठ नागरिकांनाही मिळणारी सवलत बंद केली जाणार नाही”, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं.

Story img Loader