Pratap Sarnaik Meet Vinod Kambli : माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी हे मागील काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यांच्यावर उपचार करण्याकरता आमदार प्रताप सरनाईक यांनी पुढाकार घेतला आहे. वेगवेगळ्या माध्यमातून जमा झालेली ३० लाख रुपयांची मदत विनोद कांबळी यांच्या पत्नीच्या खात्यात पाठवण्यात येणार असल्याची माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली. विनोद कांबळी यांची भेट घेतल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी त्यांच्यासोबत मिश्किल संवादही साधला आहे.
प्रताप सरनाईक म्हणाले, “तुझा लिव्हर आता एकदम फ्रेश असेल ना. लिव्हरला तू त्रासच दिला नाहीस.” यावर, “आता मी दारू बंद केली”, असं तत्काळ विनोद कांबळी म्हणाले. “आता सहा महिन्यांपूर्वी बंद केलीस. पण त्याआधी किती वर्षे प्यायलास ना”, असं प्रताप सरनाईक म्हणताच विनोद कांबळी म्हणाले की, “तेव्हा मी ऑस्ट्रेलियामध्ये होतो.”
हेही वाचा >> विनोद कांबळी यांना ३० लाखांची मदत; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
प्रताप सरनाईक पढे म्हणाले, “आता असं ठरलंय की तुझ्या सर्व चाचण्या करून तुझ्यावर उपचार करणार.”, तेवढ्यात विनोद कांबळी म्हणाले की, माझी बायको अँड्र्यू कांबळी सगळं बघते.” तेव्हा प्रताप सरनाईक म्हणाले, “आता ती करते.. पण आधी किती भांडत होतास तिच्याबरोबर?” जाऊदे जे झालं ते झालं. आता तू काळजी करायची नाही. लाईफ मस्तपैकी एन्जॉय करायचं.”
विनोद कांबळींवर आता शिंदे आणि सरनाईकांचं लक्ष
१५ दिवसांपूर्वी भिवंडी येथील आकृती रुग्णालयातील डाॅक्टरांचे पथक वांद्रे येथील कांबळी यांच्या निवासस्थानी त्यांच्या प्रकृतीची विचारणा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी कांबळी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन शक्य झाल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार, कांबळी यांच्या कुटुंबियांनी शनिवारी त्यांना भिवंडी आकृती रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातील डॉक्टरांचे पथक कांबळी यांच्यावर उपचार करत आहेत. कांबळी हे डाॅक्टर आणि माध्यमांसोबत संवादही साधताना दिसतात. कांबळी यांना चालताना त्रास होत होता. तसेच इतरही अनेक आजार त्यांना होते. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माहिती मिळताच त्यांच्या आदेशानुसार त्यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी भेट त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. तसेच डाॅ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. त्यानंतर बुधवारी दुपारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही त्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.