Pratap Sainaik on ST Bus : विधानसभा निवडणुकीच्या आधी एकनाथ शिंदे यांच्या नेतृ्त्वाखालील महायुतीचं सरकार सत्तेत असताना राज्यातील सर्व महिलांना एसटी महामंडळाच्या बसच्या प्रवासासाठी ५० टक्के सवलत अर्थात अर्धे तिकीट देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही सलत सध्याही महिलांना मिळते. तसेच जेष्ठ नागरिकांना देखील एसटी प्रवासात सवलत देण्यात येते. मात्र, या सवलती संदर्भात राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक मोठं विधान केलं आहे. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना दिलेल्या सवलतींमुळे एसटी तोट्यात गेली असल्याचं मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, राज्यातील महिलांना बसच्या प्रवासात पन्नास टक्के दिलेल्या सवलतीमुळे एसटीला आर्थिक तोटा सहन करावा लागणार असल्याची टीका विरोधकांकडून सातत्याने करण्यात आली. मात्र, महायुतीच्या अनेक नेत्यांनी एसटीला फायदा होत असल्याचं म्हटलं होतं. तसेच या योजनेमुळे एसटीला तोटा होणार नसल्याचं वारंवार महायुतीच्या नेत्यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या सरकारमधील राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाला दिवसाला ३ कोटींचा तोटा होत असल्याची थेट कबुलीच दिली आहे.

प्रताप सरनाईक काय म्हणाले?

“एसटी महामंडळाच्या सर्व बसेसमध्ये सवलत मिळाली, आता आमच्या बहि‍णींना ५० टक्के सवलत, तसेच जेष्ठ नागरिकांनाही बसमध्ये वर्षांला सवलत आणि त्या सवलतींमुळे परिस्थिती अशी झाली की एसटी बस दरदिवशी तब्बल ३ कोटी रुपये तोट्यात आहे. आपण सर्वांनाच सवलत देत बसलो तर मला असं वाटतं की एसटी महामंडळ चालवणं कठीण होईल. त्यामुळे सध्या तरी मी याचा विचार करू शकत नाही”, असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.

‘यापुढे नवीन सवलत दिली जाणार नाही…’

दरम्यान, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एका कार्यक्रमात बोलताना महिलांना एसटीच्या प्रवासात ५० टक्के सूट दिल्यामुळे आणि जेष्ठ नागरिकांना दिलेल्या सवलतींमुळे एसटी महामंडळाला आर्थिक तोटा होत असल्याचं स्पष्ट केलं आहे. याचवेळी आता यापुढे एसटीत कोणत्याही प्रकारची नवीन सवलत मिळणार नाही, असंही मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं आहे. एवढंच नाही तर अशा प्रकारच्या सवलती दिल्या तर एसटी महामंडळ चालवणं कठीण होईल असं सूचक विधानही त्यांनी केलं. दरम्यान, प्रताप सरनाईक यांच्या विधानामुळे एसटीच्या प्रवासात महिलांना दिली जाणारी सवलत बंद होणार नाही ना? याबाबत उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत.