लोकसत्ता प्रतिनिधी
सातारा : काँग्रेसचे माजी प्रांताध्यक्ष कै. प्रतापराव भोसले यांचे नातू आणि भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार मदन भोसले यांचे पुतणे यशराज भोसले यांनी पुण्यात खासदार शरद पवार यांची भेट घेतली. भोसले यांनी शक्तिप्रदर्शन करीत वाई विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीची मागणी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाईचे राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांनी पक्षफुटीनंतर अजित पवार यांच्यासोबत जाणे पसंत केले. त्यामुळे आगामी निवडणुकीत शरद पवार गटाकडून मकरंद पाटील यांच्याविरोधात त्यांचे परंपरागत प्रतिस्पर्धी माजी आमदार आणि भाजप नेते मदन भोसले गटाशी संपर्क सुरू झाला आहे. याअंतर्गत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकतीच मदन भोसले यांची साताऱ्यात भेट घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर यशराज भोसले यांच्या पवार भेटीला महत्त्व दिले जात आहे.

हेही वाचा >>>शासकीय अधिकाऱ्यासह पोलिसाला अज्ञात भामट्यांकडून लाखोंचा गंडा

या भेटीनंतर यशराज भोसले म्हणाले, की प्रतापराव भोसले यांचे शरद पवारांशी पूर्वापार राजकीय वैर होते. मात्र, अखेरच्या काळात राजकारणात काम करायचे असेल, तर शरद पवार यांची भेट घेण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे भेट घेतली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे पक्षसदस्यत्व स्वीकारल्याचे भोसले यांनी सांगितले.

सातारा जिल्ह्यात यशवंतराव चव्हाणांच्या विचाराचा पगडा असून, त्यांचे राजकीय वारसदार म्हणून शरद पवार यांच्याकडे पाहिले जाते. त्यांचा विचार पुढे घेऊन जाणाऱ्या विचारांचा भोसले घराणे आदर करीत असून, कै. प्रतापराव भोसले यांनी राजकारण करावयाचे झाल्यास शरद पवार यांच्या बरोबर जाणे योग्य असल्याचे सांगितले होते, असे भोसले यांनी आवर्जून सांगितले. शरद पवारांनी अन्य कोणालाही उमेदवारी दिल्यास त्यांचे काम करणार असून, त्यासाठी डॉ. नितीन सावंत, ॲड. विजयसिंह पिसाळ, अनिल जगताप यांच्याशी योग्य समन्वय साधणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा >>>Mahendra Thorve : “शिंदेंच्या आमदाराच्या सुरक्षा रक्षकाची भर रस्त्यात एकाला रॉडने मारहाण, चिमुकल्यांचा टाहो”, ठाकरे गटाकडून VIDEO व्हायरल

विकासाच्या नुसत्या गप्पा मारणाऱ्यांना या वेळी जनता घरी बसविणार असून, त्याचे प्रत्यंतर लोकसभा निवडणुकीत दिसून आल्याने शशिकांत शिंदे यांना वाई मतदारसंघात मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे या वेळी वाईमध्ये तुतारीच वाजणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, जयंत पाटील यांनी नुकतीच भाजप नेते आणि माजी आमदार मदन भोसले यांची साताऱ्यात भेट घेतली होती. या भेटीनंतर भोसले यांनी कार्यकर्त्यांची भूमिका समजून घेण्यासाठी वाईमध्ये आढावा बैठकीचे आयोजन केले होते. त्यामध्ये तुतारीला साथ देण्याचे संकेत मिळाले असल्याने, तसेच मदन भोसलेंनी योग्य भूमिका घ्यावी, असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला आहे.