गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस नेत्यांमधील धुसफूस पाहायला मिळत आहे. अशातच चंद्रपूर लोकसभेच्या जागेवरून काँग्रेस नेत्यांमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. चंद्रपूर लोकसभेचं तिकीट मिळावं यासाठी या मतदारसंघाचे माजी दिवंगत खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या पत्नी आणि आमदार प्रतिभा धानोरकर प्रयत्न करत आहेत. दुसऱ्या बाजूला पक्षातील इतरही नेते या जागेसाठी पक्षश्रेष्ठींचं मन आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मुलगी तथा प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानी वडेट्टीवारदेखील या जागेसाठी इच्छूक आहेत. शिवानी वड्डेटीवार यांना चंद्रपूरमधून लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी विजय वडेट्टीवार हे थेट दिल्लीतून मोर्चेबांधणी करत आहेत. तर आमदार प्रतिभा धानोरकर यांनी मुंबई, दिल्ली आणि स्थानिक अशा तिन्ही आघाड्यांवर प्रयत्न सुरू केले आहेत.
दरम्यान, प्रतिभा धानोकर यांना त्यांच्या विधानसभा मतदारसंघातही पक्षातील काही नेत्यांकडून विरोध सुरू असल्याचं बोललं जात आहे. अशातच प्रतिभा धानोकर यांनी पक्षांतर्गत वादांवर भाष्य केलं. तसेच त्यांना पक्षातील नेत्यांकडून होणाऱ्या विरोधाची माहिती दिली. आमदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या, आमच्या पक्षात असे अनेक लोक आहेत, जे सतत माझा विरोध करत आहेत. माझे पती दिवंगत माजी खासदार बाळू धानोरकर यांचं निधन झाल्यापासून मला पक्षातील काही लोक विरोध करत आहेत. त्यांनी माझ्या नवऱ्याचा जीव घेतला, आता ते माझ्याही मागे लागले आहेत. या संघर्षात एक जीव गेला आहे. आता दुसरा जीव जाणार नाही याची काळजी मी घेईन. हे करत असताना मी नक्कीच पक्षाची ध्येयधोरणं सांभाळेन. तसेच पक्षश्रेष्ठी घेतील तो निर्णय अंतिम असेल आणि तो निर्णय मला मान्य असेल.
दरम्यान, पक्षांतर्गत वाद आणि इतर नेत्यांमुळे होत असलेल्या विरोधामुळे आमदार प्रतिभा धानोरकर पक्षाला रामराम करून भाजपा किंवा महायुतीतल्या इतर पक्षात जाऊ शकतात, अशी चर्चा चालू होती. यावर प्रतिभा धानोरकर यांनी भाष्य केलं आहे. त्या म्हणाल्या, मी काँग्रेसच्या तिकीटावरच आगामी निवडणूक लढणार आहे.
हे ही वाचा >> Vasant More Resignation: वसंत मोरेंचा मनसे आणि राज ठाकरेंना अखेरचा जय महाराष्ट्र, मध्यरात्री केली होती ‘ती’ पोस्ट
प्रतिभा धानोरकर यांच्या या वक्तव्यानंतर मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. दरम्यान, काही वेळापूर्वी त्यांनी टीव्ही ९ मराठीशी बातचीत केली. यावेळी त्या म्हणाल्या, खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनाच्या दोन ते तीन महिने आधीपासून आमच्याच पक्षातील काही लोकांनी त्यांना मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला होता. त्या त्रासाला कंटाळून त्यांची तब्येत बिघडली. त्या त्रासामुळेच त्यांचं दुःखद निधन झालं, हे सर्वांना माहिती आहे. मी कुठल्याही एका व्यक्तीवर हा आरोप केलेला नाही. मी पक्षातील वास्तविकता मांडली आहे.