राष्ट्रवादीचे नेते जयंतराव पाटील यांची अन्य मतदारसंघातील वाढता हस्तक्षेप थोपविण्यासाठी त्यांची इस्लामपुरातच कोंडी करण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात आहेत. त्यांची कोंडी करण्यासाठी काँग्रेससह सर्व पक्ष एकत्र येण्याची चिन्हे असून विरोधकामधील मतविभागणी टाळण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी एकत्र आले आहेत. या ठिकाणी सर्वपक्षीय उमेदवार म्हणून अभिजित पाटील यांच्या नावावर एकमत होण्याच्या मार्गावर असून बुधवारी दुपापर्यंत हे चित्र स्पष्ट होणार आहे.
जिल्ह्यामध्ये महायुती आणि आघाडीच्या फुटीनंतर इच्छुकांना उमेदवारीची लॉटरी लागली असून राज्यात सत्तेचा दावा करणारे चार चार पक्ष एकामेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळाली. इस्लामपूर मतदार संघामध्ये राष्ट्रवादीचे नेते जयंतराव पाटील यांनी अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून उमेदवारी दाखल केली. सहकारी साखर कारखाना, सूतगिरणी, राजाराम बापू बँक या माध्यमातून त्यांचा सहकार क्षेत्रातील दबदबा असल्याने आणि त्यांचा हा पारंपरिक मतदार संघ असल्याने धोका नाही.
मतदार संघ सुरक्षित असल्याने जयंत पाटील अन्य मतदार संघामध्ये आपल्या सोयीचे राजकारण करीत असतात असा समज जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रामध्ये निर्माण झाला आहे. कोणाला निवडून आणायचे आणि कोणाला घरी बसवायचे आडाखे इस्लामपूरमध्ये ठरू शकतात, असा मतप्रवाह असल्याने येथील कौल ब-याच वेळा महत्त्वाचा ठरू शकतो. हे ओळखून प्रतीक पाटील यांनी लोकसभेला उमेदवारी दाखल करताच सर्वप्रथम जयंत पाटील यांचा आशीर्वाद घेण्यासाठी इस्लामपूर गाठले होते. मात्र अखेरच्या क्षणी राष्ट्रवादीची कुमक भाजपाच्या दिमतीला असल्याचे मतदार बूथवर लक्षात आले. मात्र तोपर्यंत सांगलीतील काँग्रेसचा पराभव इतिहासात नोंदला गेला होता.
हे राजकीय डावपेच लक्षात घेउन प्रतीक पाटील यांनी आघाडीची जागा वाटपाबाबत चर्चा सुरू असतानाच इस्लामपुरात तळ ठेकला असून हिशोब चुकता करण्यासाठी चंग बांधला आहे. या वेळी त्यांना स्वाभिमानीचे खा. राजू शेट्टी मदतीला असून जितेंद्र पाटील यांच्या माध्यमातून विरोधकामधील मतविभागणीचा लाभ राष्ट्रवादीला मिळू द्यायचा नाही असे प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेचे भीमराव माने आणि अपक्ष म्हणून िरगणात उतरलेले नानासाहेब महाडिक यांचीही या कृतीला संमती मिळाली आहे.
सर्व पक्षीय उमेदवार म्हणून अभिजित पाटील यांची उमेदवारी कायम ठेवायची आणि शिवसेनेसह अन्य अपक्षांनी आपली उमेदवारी मागे घ्यायची, असा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या संदर्भात राजू शेट्टी आणि प्रतीक पाटील यांच्यामध्ये काल रात्री बठक झाली असून याबाबत उद्या उमेदवारी मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत निर्णय घेतला जाणार आहे.
जयंत पाटलांच्या विरोधात प्रतीक पाटील, राजू शेट्टी एकत्र
जिल्ह्यामध्ये महायुती आणि आघाडीच्या फुटीनंतर इच्छुकांना उमेदवारीची लॉटरी लागली असून राज्यात सत्तेचा दावा करणारे चार चार पक्ष एकामेकांसमोर उभे ठाकले आहेत.
First published on: 01-10-2014 at 03:15 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pratik patil and raju shetty together against jayant patil