कोणताही डामडौल अथवा गाजावाजा न करता विद्यमान खासदार प्रतीक पाटील यांनी पहिल्याच दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर झालेल्या कार्यकर्त्यांच्या बठकीत आघाडीच्या दोन्ही काँग्रेस पदाधिका-यांना विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करणार असल्याचा निर्वाळा दिला. पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यकर्त्यांच्या बठकीत दुष्काळी फोरमच्या नेत्यांनी हजेरी लावल्याने भाजपची रसद काँग्रेसने पहिल्याच दिवशी तोडल्याचे स्पष्ट संकेत मिळाले.
लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्यास आजपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी प्रतीक पाटील यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केला. त्यांच्या समवेत या वेळी पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, माजी आमदार अनिल बाबर आदी मोजकेच नेते उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये जिल्ह्यातील आघाडीच्या कार्यकर्त्यांची बठक झाली. या बठकीत डॉ. कदम यांनी सर्वच कार्यकर्त्यांना एकदिलाने काम करण्याचे आवाहन करून सांगितले, की राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना ताकीद दिली असून कोणत्याही स्थितीत गाफील न राहता काम करायचे आहे. काँग्रेसचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्करराव जाधव व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे पत्र त्या त्या पक्षाच्या पदाधिका-यांना पाठविण्यात येणार आहेत. गरज असेल त्या वेळी मी सांगलीत उपलब्ध असेन, मात्र पुणे येथील विश्वजित कदम यांची उमेदवारी जाहीर झाल्याने त्या ठिकाणीही माझी जबाबदारी वाढली आहे. तथापि जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मोहनराव कदम हे पक्षकार्यासाठी सांगलीतच राहतील.
या बठकीस दुष्काळी फोरममध्ये असणा-या राष्ट्रवादीचे माजी आ. राजेंद्र देशमुख, पृथ्वीराज देशमुख यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार रमेश शेंडगे, माजी आ. अनिल बाबर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. रमेश शेंडगे यांनी आघाडीच्या उमेदवारासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याचे आदेश पक्षाध्यक्ष पवार यांनी दिले असल्याचे सांगितले. दुष्काळी फोरममध्ये असणा-या अजित घोरपडे, विलासराव जगताप यांची मात्र या बठकीस अनुपस्थिती होती. याशिवाय काँग्रेसचे माजी मंत्री तथा उर्वरित वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष मदन पाटील या बठकीस उपस्थित नव्हते. याची मात्र कार्यकर्त्यांत जोरदार चर्चा सुरू होती. महापौर कांचन कांबळे, उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मालन मोहिते याही या बठकीस उपस्थित होत्या.
भाजपची आज उमेदवारी
भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संजयकाका पाटील हे संकष्टीच्या मुहूर्तावर उद्या गुरुवार दि. २० मार्च रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या वेळी महायुतीचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर महायुतीचा मेळावा सांगलीच्या स्टेशन चौकात आयोजित करण्यात आला आहे.
महायुतीच्या मेळाव्यासाठी गोपीनाथ मुंडे यांच्यासह खासदार राजू शेट्टी, रामदास आठवले, महादेव जानकर, दिवाकर रावते आदी उपस्थित राहणार असल्याचे भाजप कार्यालयातून सांगण्यात आले.
दरम्यान, काँग्रेसचे माजी आमदार हाफीज धत्तुरे यांनी आज उमेदवारी अर्ज घेतला असून, शनिवारी ते आपली उमेदवारी दाखल करणार आहेत. बंडखोरीचा आपला निर्णय ठाम असून कोणाच्याही दबावाला बळी न पडता आपण निवडणूक लढविणार असल्याचे धत्तुरे यांनी सांगितले.
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा