अलिबाग – रायगड जिल्ह्यात आज साखरचौथीच्या गणपतींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात साखरचौथीच्या गणेशोत्सवाचे प्रस्त बरेच वाढत चालले आहे. यंदा २९२ सार्वजनिक आणि ५०० हून अधिक घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे.
रायगड जिल्ह्याच्या उत्तर भागात हा साखरचौथीचा गणेशोत्सव मोठ्याप्रमाणात साजरा केला जातो. गणेशोत्सवात अनंत चतुर्दशीनंतर येणार्या पहिल्या संकष्टी चतुर्थीला म्हणजेच भाद्रपद वद्य चतुर्थीला या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. याला गौरा गणपती असेही म्हटले जाते. रायगड जिल्ह्यात पेण, पनवेल, उरण, कर्जत, अलिबाग या तालुक्यांमध्ये हा उत्सव साजरा केला जातो.
हेही वाचा – पाणी प्रश्नाबाबत रोहित पाटलांचा ठाम निर्धार; म्हणाले, “आबांचा जो इतिहास…”
पेण तालुक्यात मोठ्या संख्येने गणेश कार्यशाळा आहेत. तेथे गणेश चतुर्थीच्या दिवसापर्यंत काम चालत असते. त्यामुळे या कारागीरांना गणेशोत्सव साजरा करता येत नाही म्हणून साखरचौथीच्या गणेशोत्सवाला सुरवात झाल्याचे काहीजण सांगतात. काहींच्या मते कोकणात घरगुती गणेशोत्सव साजरा होत असतो. मात्र येथील भक्तांना सार्वजनिक गणेशोत्सवाचा आनंद लुटता येत नाही. ही संधी सर्वांना मिळावी या हेतूने या उत्सवाची सुरुवात झाली असे सांगितले जाते.
रस्त्यालगत मोठे सभामंडप, आकर्षक रोषणाई, भव्यदिव्य विसर्जन मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रम ही या गणेशोत्सवाची ओळख बनली आहे. कुठलेही धार्मिक अधिष्ठान नसताना केवळ सामाजिक अधिष्ठानाच्या जोरावर या गणेशोत्सवाला साजरा करण्याचा कल वाढत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही वर्षांत साखरचौथी गणेशोत्सव मंडळांची संख्या वर्षागणिक वाढत आहे. यंदा २९२ सार्वजनिक आणि ५०० हून अधिक घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. कुठे दिड दिवस तर कुठे पाच दिवस हा गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे.