आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आज पुन्हा एकदा निशाणा साधला. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात वर्षभर झालेल्या शेतकरी आंदोलनात ७०० शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यावरून तोगडिया यांनी टीका केली आहे. शिवाय, मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत दिली जावी अशी देखील मागणी केली आहे.
“पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काळे कृषी कायदे परत घेतल्याबद्दल अभिनंदन. पण हेच पाऊल दहा महिने आधी उचलले असते तर ७०० शेतकऱ्यांचा बळी गेला नसता. याचे प्रायश्चित्त करायचे असेल तर मोदींनी मृतक शेतकऱ्यांच्या परिवाराला एक-एक कोटी रुपये मदत राशी द्यावी.” अशा शब्दांत प्रवीण तोगडिया यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. आज, बुलडाणा येथे ते आले होते, यावेळी त्यांच्या संबोधन कार्यक्रममध्ये बोलताना त्यांनी मोदींवर टीका केली.
तसेच, “मृतांच्या परिवारांना केवळ ७०० कोटींची मदत देणे खूप काही कठीण नाही. मोदी सरकारने त्यांना तत्काळ मदत करावी.”, अशी आग्रही मागणी तोगडिया यांनी केली आहे.
याचबरोबर नमाजला सुद्धा तोगडिया यांनी प्रखर विरोध केला असून सार्वजनिक ठिकाणी मुसलमानांनी नमाज पठण करू नये, त्यांनी मशिदीत किंवा त्यांच्या घरात नमाज पठण करावे, असेही मत प्रवीण तोगडिया यांनी यावेळी व्यक्त केले.