“मनुष्यामध्ये अंधश्रद्धा ही जन्मजात नसून ती त्या व्यक्तीवर समाजामार्फत लादली गेलेली असते. म्हणूनच ती आपण दूर करू शकतो. सध्या विवेकाचं साम्राज्य नष्ट व्हावे असे प्रयत्न गेल्या काही वर्षापासून देशात हेतूपुरस्सरपणे केले जात आहेत. विवेकी विचार नष्ट करण्याचे संघटित प्रयत्न जोमात सुरू आहेत. हे कार्यकर्त्यांनी समजून घेऊन त्या शक्तीचा प्रतिकार केला पाहिजे,” असे मत साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक प्रवीण बांदेकर यांनी व्यक्त केले. ते मालवण येथील नाथ पै सेवांगणाच्या सभागृहात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने आयोजित ‘आधारस्तंभ व शतकवीर कार्यकर्ता पुरस्कार वितरण सोहळा’ कार्यक्रमातात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रवीण बांदेकर म्हणाले, “समाजामध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. संभ्रम निर्माण करून विचार करण्याच्या शक्तीला संघटितपणे खीळ घातली जात आहे. यामुळे समाज संभ्रमित झालेला आहे. त्यामुळे बुद्धिजीवींची जबाबदारी आणखी वाढली आहे. प्रतिगाम्यांनी जाणीवपूर्वक निर्माण केलेले वैचारिक अडथळे आधी दूर करावे लागणार आहेत. वर्तणुकीतील विसंगतीने भरलेल्या समाजाला दिशा देण्याची मोठी जबाबदारी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारख्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर आहे.”

“सध्या देश एका कठीण कालखंडातून जात आहे. देशातील सध्याचे वातावरण चिंताजनक आहे. याला पांढरपेशी लोकांची उदासीनता, थंड राहणं कारणीभूत आहे,” अशी टीकाही बांदेकर यांनी केली.

प्रवीण बांदेकर पुढे म्हणाले, “धर्मांधता व अंधश्रद्धेला पूरक असे वातावरण शिक्षण संस्थांमध्ये अतिशय जाणीवपूर्वक निर्माण केले जात आहे. विज्ञानावरती बोलत असतानाच एकाच वेळी परस्पर विरोधी धार्मिक कृतींचा सर्रास वापर केला जातो आहे, ही चिंतेची बाब आहे. यामध्ये अनेकदा आपण पण कळत नकळतपणे हातभार लावतो. हे जाणीवपूर्वक टाळायला हवे.”

“सामाजिक, विवेकवादी चळवळीतील कार्यकर्ते म्हणून ती आपली नैतिक जबाबदारी ठरते. वर्तणुकीतल्या अशा विरोधाभासी वातावरणात अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून वेगळ्या अपेक्षा आहेत. अंनिस कार्यकर्ते लोकांमध्ये थेट संवाद करीत असतात. लोकांचा या कार्यकर्त्यांवर विश्वास आहे,” असंही बांदेकर यांनी नमूद केलं.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना बॅ. नाथ पै सेवांगणाचे अध्यक्ष अॅड. देवदत्त परुळेकर यांनी ‘अंधार फार झाला पणती जपून ठेवा’ अशा शब्दात सध्याची परिस्थिती किती गंभीर आहे यावर आपले मत व्यक्त केले. “कार्यकर्त्यांनी याच परिस्थितीचा आवाका जाणून घेत, समजून घेत काम करणे गरजेचे आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जेष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांनी त्यांचे अनेक अनुभव उपस्थित कार्यकर्त्यांसमोर मांडले.

ते म्हणाले, “परिस्थितीचे भान ठेवून व सध्याचे धर्मांध वातावरण पाहता, धर्माची कृतिशील चिकित्सा करताना त्या धर्माला समजून घेतच प्रबोधन केलं पाहिजे. विरोधक धर्मामध्ये घुसखोरी करीत आहेत. त्यामुळे समाज प्रबोधन करताना, रूढी परंपरांवर आघात करताना वारकरी परंपरेचा आधार घेऊन समाजात बदल घडवून आणावे लागतील.”

हेही वाचा : “पिंडीवर बर्फ झाल्याचा बनाव करणाऱ्यांविरोधात जादुटोणा विरोधी कायद्याची कलमं लावा”, अंनिसची मागणी

कार्यक्रमाची सुरुवात अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या वेबसाइटने एक लाख वाचक संख्या पार केलेल्या फलकाचे अनावरण प्रवीण बांदेकर, दिपक गिरमे यांच्या हस्ते करून झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजीव देशपांडे यांनी केले तर पुरस्कारामागची भूमिका मुक्ता दाभोलकर यांनी मांडली. सूत्रसंचालन राहुल थोरात यांनी केले. आभार अनिल चव्हाण यांनी मांडले.

या पुरस्कार वितरण सोहळ्याला अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र ट्रस्टचे विश्वस्त सचिव दीपक गिरमे, गणेश चिंचोले, सेवागंण चे सेक्रेटरी लक्ष्मीकांत खोबरेकर, मंगलाताई परुळेकर, व्यवस्थापक संजय आचरेकर, अंनिस कार्यकारी समिती मंडळातील सदस्य डॉ. हमीद दाभोलकर, प्रवीण देशमुख, रामभाऊ डोंगरे, प्रा. अशोक कदम, अॅड. देविदास वडगावकर, मिलिंद देशमुख यांचे सह महाराष्ट्रच्या २३ जिल्ह्यातील २०० पेक्षा जास्त अंनिस कार्यकर्ते उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pravin bandekar comment on caste hate in anis program malvan pbs