गुलाब चक्रीवादळामुळे राज्यातल्या विदर्भ मराठवाडा भागात मोठं नुकसान झालं आहे. काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान झालं असून जीवित आणि वित्तहानीही मोठ्या प्रमाणावर झाली आहे. यावरुनच आता विरोधी पक्षाने सरकारवर निशाणा साधला आहे. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बाबतीत संवेदनशील नाहीत, अशी टीका केली आहे.

पुण्यात पत्रकार परिषदेत दरेकर बोलत होते. यावेळी ते म्हणाले, आज एवढे दिवस झाले अजूनही शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येत्या दोन दिवसात देवेंद्र फडणवीस मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बाबतीत संवेदनशील नाहीत. मुख्यमंत्र्यांनी अद्यापही मागील मदत शेतकर्‍यांना केलेली नाही. आता घोषणा पुरे झाल्यात आता थेट मदत करावी.

ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करताना दरेकर म्हणाले, आमची मागणी आहे की तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा. वडेट्टीवारांनी सांगितले दोन दिवसात मदत करू मात्र अजून मदत नाही.आज मराठवाडा पूर्णपणे उध्वस्त झाला आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांची चेष्टा केली जात आहे, अशा वेळी मंत्र्यांचे जल्लोषात स्वागत करणे योग्य नाही. काही झालं की केंद्रावर ढकलायचं हे नेहमीचंच आहे. केंद्राने आतापर्यंत दीड हजार कोटींची मदत केली आहे. सत्तेत गेल्यावर शिवसेनेची भूमिका बदलली आहे.आधी विमा कंपन्यांची कार्यालय फोडणारी सेना आता कुठे गेली? आता आक्रमक होण्याची गरज नाही, शेतकऱ्यांना मदत द्या.

मनसेसोबत युती करण्याबद्दल विचारणा करण्यात आली असता ते म्हणाले की, राज्य पातळीवरचे आमचे नेते निर्णय घेतील.शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री नवाब मलिक यांची टीका आम्ही गांभीर्याने घेत नाही, असंही दरेकर यावेळी बोलताना म्हणाले. आगामी महापालिका निवडणुकीत पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाच राहील, असा विश्वासही दरेकर यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले, पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये आम्ही मागील पाच वर्षात चांगली कामं केली आहेत. त्यामुळे आमच्या पक्षाचा झेंडा निश्चित महापालिकेवर फडकेल आणि जनता आमच्या पाठीशी राहील.

Story img Loader