संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांची चिंता करण्यापेक्षा शिवसेनेची चिंता करावी, असा सल्ला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिला आहे. राष्ट्रवादीची चिंता केल्यामुळे शिवसेनेत नाराजी आणि अस्वस्थता असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय संन्यास घेण्याच्या वक्तव्यावरुन संजय राऊत आम्ही फडणवीसांना संन्यास घेऊ देणार नाही, असं म्हणाले होतं. त्याचबरोबर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातूनही शिवसेनेने फडणवीसांना चिमटे काढले होते.

तीन महिन्यांत ओबीसींना आरक्षण मिळवून दिलं नाही, तर राजकीय संन्यास घेईन, अशी घोषणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाने पुकारलेल्या चक्का जाम आंदोलनादरम्यान केली होती. मी त्यांची भेट घेईन, मी फडणवीसांना संन्यास घेऊ देणार नाही, असं राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले. शिवसेनेनं सामना अग्रलेखातून भाष्य केल्यानंतर आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही यावर भूमिका मांडली. फडणवीसांनी फकीर होण्याची भाषा करणं योग्य नाही, असंही ते बोलताना म्हणाले.

आणखी वाचा- “फडणवीस म्हणाले होते, स्वतंत्र विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही; त्याचं काय झालं?”

देशात, राज्यात फार कमी चांगली नेतृत्व आहेत. फडणवीस त्यापैकी एक आहेत. त्यामुळे त्यांनी संन्यास घेतला तर भारतीय जनता पार्टीचं तसंच जनतेचंही मोठं नुकसान होईल, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तर आजच्या ‘सामना’च्या अग्रलेखामधूनही राऊतांनी फडणवीसांवर खोचक टीका केली आहे. “आज रस्त्यांवर गर्दी जमवून आदळआपट करून काय साध्य करणार? भाजपा व त्यांचे पुढारी विद्वान आहेत, कायदेबाज आहेत. त्यामुळे सरकारच्याच बरोबरीने ओबीसी आरक्षणाची लढाई त्यांनी सुरूच ठेवावी व ओबीसींना आरक्षण मिळवून देण्यास हातभार लावावा. आम्हाला चिंता मराठा आणि ओबीसी आरक्षणाची आहेच, पण फडणवीस यांनी केलेल्या राजकीय संन्यास घेण्याच्या घोषणेचीदेखील आहे. फडणवीसांनी असा त्रागा करून घेऊ नये. सर्वकाही सुरळीत व त्यांच्या मनाप्रमाणे होईल. संन्यास घेतील त्यांचे दुष्मन!,” अशा शब्दात शिवसेनेनं फडणवीसांना चिमटे काढले आहेत.

Story img Loader