‘फडतूस’ आणि ‘काडतूस’ या शब्दांवरून राज्यात भाजपा आणि शिवसेनेत (ठाकरे गट) घमासान सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना ‘फडतूस गृहमंत्री’ म्हटल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी फडतूस नव्हे काडतूस आहे’ असं उत्तर दिलं. दरम्यान, भाजपाचे नेते उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटावर हल्लाबोल करत आहेत. तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हेदेखील भाजपाला प्रत्यूत्तर देत आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची माफी मागून वादावर पडदा टाकावा असा सल्ला भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना सल्ला दिल्यानंतर भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी याच विषयावरून उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. “माफी मागून वादावर पडदा टाकतील ते उद्धव ठाकरे कसले”, असा टोला दरेकरांनी लगावला आहे. दरेकर म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे खूप संयमी नेते आहेत. शिवसेना भाजपाच्या सत्ताकाळात अनेकदा उद्धव ठाकरेंना त्यांनी समजून घेतलं. अगदी भावासारखं प्रेम आणि सहकार्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे हे आम्हाला माहिती आहे, संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे.
दरेकर म्हणाले की, उद्धव ठाकरे हे अहंकाराने ओतप्रोत असे नेते आहेत. अहंकार आणि इगोमुळे त्यांच्या पक्षाची वाट लागली. पक्ष लयाला गेला, ते पक्षाचं चिन्हदेखील घालवून बसले. अहंकारापुढे सर्व गोष्टी त्यांच्यासमोर शून्य होतात.
हे ही वाचा >> “बाळासाहेबांनी मला राजकारणात मोठं केलं, तर शरद पवार हे…”, संजय राऊतांचं वक्तव्य
“देवेंद्र फडणवीस मोठ्या मनाचे”
उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची माफी मागून फडतूस या शब्दावरून सुरू असलेल्या वादावर पडदा टाकावा असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी दिला होता. तसेच देवेंद्र फडणवीस हे मोठ्या मनाचे आहेत. ते माफ करतील असंही पाटील म्हणाले होते.