निमंत्रण पत्रिकेत माझं नाव आहे, मात्र देवेंद्र फडणवीस यांचं नाव नाही. त्यामुळे मी कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाही, अशा आशयाचं पत्र देत प्रविण दरेकर यांनी एका कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. एका विरोधी पक्षनेत्याचं नाव टाकायचं आणि दुसऱ्याचं नाही टाकायचं हे राजशिष्टाचाराला धरुन नाही असं मतही त्यांनी या पत्रात व्यक्त केलं आहे.
कलानगर जंक्शन इथल्या सागरी सेतूकडून बांद्रा कुर्ला संकुलाच्या दिशेने जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या मार्गिकेचं लोकार्पण आणि मालाड पश्चिम इथल्या कोविड रुग्णालयाच्या हस्तांतरण सोहळ्याचा हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचं निमंत्रण विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मिळालं आहे. त्यांचं नाव निमंत्रण पत्रिकेवरदेखील आहे. मात्र, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना या कार्यक्रमाचं निमंत्रण नाही. त्यांचं नाव कार्यक्रम पत्रिकेत नाही. यावर दरेकरांनी आक्षेप घेतला आहे.
आपल्या पत्रात ते म्हणतात, “गेल्या महिन्यातही कांदिवली इथल्या एका कार्यक्रमातही त्यांचं नाव नव्हतं. मी ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. एखादी बाब जेव्हा वारंवार घडते, तेव्हा जाणीवपूर्वक ती केली जाते असा अर्थ त्यातून निघतो.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मुंबईतल्या विकासासंदर्भातली अनेक कामं केलं आहेत. त्यामुळे त्यांचं ते योगदान दुर्लक्षित न करता येण्यासारखं असल्याचंही त्यांनी सांगितलं. ते म्हणतात, “देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना एमएमआरडीए परिसरातील पायाभूत सुविधांशी निगडीत अनेक विकासकामं सुरु झाली. त्यामुळे मुंबईच्या विकासासंदर्भातलं त्यांचं योगदान दुर्लक्षित करता येणार नाही. सध्या ते विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. एका विरोधी पक्षनेत्याचे नाव टाकायचे आणि दुसऱ्याचे टाकायचे नाही ही बाब राजशिष्टाचाराला धरुन नाही”.
हेही वाचा- “मुंबई महापालिकेला शरमेनं मान खाली घालायला लावणारी ही घटना आहे”
त्यांनी हे पत्र एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस.व्ही. आर. श्रीनिवास यांना लिहिलं आहे. यात त्यांनी आपली ही कृती उचित वाटत नसल्याचंही बोलून दाखवलं आहे. दरेकर म्हणतात, “आपण केलेली कृती उचित वाटत नाही. त्यामुळे मी आपल्याला त्याची जाणीव करुन देत आहे. उद्याच्या कार्यक्रमाला मी या कारणास्तव उपस्थित राहू शकणार नाही”.