राज्यात सशक्त लोकआयुक्ताची नियुक्ती करणे तसेच राज्यातील विशेषत: विदर्भात होत असलेल्या शेतक-यांच्या आत्महत्या थांबविण्यास नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राधान्य द्यायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त करीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
नव्या मुख्यमंत्र्यांकडून काय अपेक्षा आहेत, असे हजारे यांना विचारले असता ते म्हणाले, फडणवीस हे चांगले म्हणजेच प्रामाणिक व हुशार आहेत. त्यांचा राज्यातील प्रत्येक प्रश्नावर सखोल अभ्यास आहे. त्यांची समाजाला न्याय मिळवून देण्याची धडपड मला महत्त्वाची वाटते.
यापुढील काळात राज्यात सशक्त लोकआयुक्ताची नियुक्ती करणे, राज्यातील खास करून विदर्भातील शेतक-यांच्या आत्महत्यांचा प्रश्न गंभीर आहे. त्या थांबविण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत. शिक्षणाचाही प्रश्न आहे, त्याचबरोबर पाणलोटक्षेत्र विकासाचा कार्यक्रम राबविणे गरजेचे आहे. राज्यात सुरू असलेल्या आदर्श गाव योजनेस गती देण्याची गरज आहे. फडणवीस यांनी राज्याला असे उभे करावे की महाराष्ट्र राज्य हे देशाला दिशा देणारे राज्य असेल, अशी अपेक्षा व्यक्त करीत हजारे यांनी फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या.