औरंगाबादच्या उस्मानपुरा भागात राहणाऱ्या कोमल अडागळे या वीस वर्षांच्या तरूणीचा मृत्यू संशयास्पदरित्या झाल्याची माहिती समोर आली आहे. कोमल तीन महिन्यांची गरोदर होती. कुत्रा चावल्याने कोमलला घाटी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिचा मृत्यू झाल आहे. ती आपल्या प्रियकरासोबत राहात होती. उस्मानपुरा भागात नागसेन नगरमध्ये राहणाऱ्या कोमलचा विवाह काही वर्षांपूर्वी झाला होता. पण ती तिच्या नवऱ्यासोबत राहिली नाही. तिच्या शेजारीच राहणाऱ्या परजित नावाच्या तरूणासोबत तिचे प्रेमसंबंध लग्नापूर्वीच जुळले होते. त्यामुळे संसार सोडून कोमल त्याच्यासोबतच राहात होती. काही दिवस हे दोघेही आनंदात राहिले. मात्र अलिकडे या दोघांमध्ये वाद वाढू लागले होते.

परजित कोमलला त्रास द्यायचा. कोमलची मोठी बहिण सुनिता अडागळेने याप्रकरणी परजितच्या विरोधात पोलिसात तक्रार दिल्याचीही माहिती समोर आली आहे. मात्र नंतर या दोघांमधला वाद मिटला होता. शनिवारी दुपारी कोमलला कुत्रा चावल्याने घाटी रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून ती आईजवळच राहात होती. तिला दिवस गेले होते. ८ दिवसांपूर्वी तिला परजित घेऊन गेला होता. मात्र शनिवारी तिला घाटी रूग्णालयात दाखल केल्याची माहिती परजितनेच कोमलच्या आईला दिली.

कोमल रूग्णालयात दाखल झाली आहे हे समजताच, तिची आई लक्ष्मीबाई यांनी रूग्णालयात धाव घेतली. कोमलवर खासगी रूग्णालयात उपचार करता यावेत म्हणून त्यांनी सुट्टीही घेतली. कोमलला खासगी रूग्णालयात घेऊन जाण्यासाठी घरी येऊन लक्ष्मीबाई कपडे बदलत होत्या. त्यानंतर लगेचच कोमल बेशुद्ध झाल्याची माहिती त्यांना मिळाली. कोमलच्या नातेवाईकांनी तिला तातडीने खासगी रूग्णालयात नेले. मात्र रूग्णालयात दाखल करेपर्यंत कोमलचा मृत्यू झाला होता अशीही लक्ष्मीबाई यांनी पोलिसांना दिली आहे.

परजित हा कोमलला त्रास द्यायचा. त्याच्या त्रासाला कंटाळून कोमल आईकडे राहायला येत असे. कोमल आईकडे आली की परजित तिला समजावून घरी नेत असे. वादावादीमुळे दोनवेळा परजितच्या विरोधात तक्रारही करण्यात आली होती. मात्र पोलिसांनी परजित आणि कोमलचे प्रेमप्रकरण असल्याचे वारंवार सांगत परजितवर कारवाई केली नव्हती. आता पोलिसांच्या दुर्लक्षामुळेच मुलगी दगावल्याचा आरोप कोमलच्या आईने केला आहे. कोमलचा मृत्यू का झाला? तिच्या मृत्यूचे कारण काय हे अद्याप समोर आलेले नाही. कोमलच्या मृत्यूचे शवविच्छेदन झाल्यावर आणि त्याचा अहवाल समोर आल्यावरच नेमके कारण समोर येऊ शकणार आहे. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Story img Loader