सोलापूर : मुंबईहून भुवनेश्वरकडे स्वतःच्या गावी परतणाऱ्या एका गरोदर महिलेला रेल्वे प्रवासातच प्रसव वेदना वाढल्या. सोलापूर रेल्वे स्थानकात या महिलेला गाडीतून उतरवून तात्काळ रूग्णालयात हलविले असता थोड्याच वेळात ती महिलेने बाळाला जन्म दिला. बाळंत माता आणि नवजात बाळ दोघेही सुखरूप आहेत.
सुभद्रा कामेश्वर साहू (वय २७, रा. भुवनेश्वर) ही नऊ महिन्यांची गरोदर महिला आपल्या पतीसमवेत मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून कोणार्क एक्सप्रेसमधून लांबच्या पल्ल्यावरील आपल्या गावाकडे निघाली होती. दुपारी दोन वाजता तिने मुंबई सोडले. रात्री कुर्डूवाडी रेल्वे स्थानक पार करताच सुभद्रा हिला अचानकपणे तीव्र प्रसव वेदना सुरू झाल्या. ही बाब लक्षात येताच रेल्वेतील तिकीट तपासणीसांनी सोलापूर रेल्वे स्थानकावरील स्टेशन मास्तर यांना कळविली. तेथून लगेचच यंत्रणा हलली.
सोलापूर लोहमार्ग पोलीस आणि आरपीएफचे कर्मचाऱ्यांसह रेल्वे स्थानकावर कार्यरत असलेल्या अश्विनी सहकारी रूग्णालयाच्या बाह्य उपचार विभागातील वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांसह रेल्वे स्थानकावर सज्ज झाली. बोगी क्र. ४ मधून गरोदर सुभद्रा हिला तात्काळ उतरवून तपासणी केली. तिला जास्तच त्रास होऊ लागल्यामुळेक्षणाचाही विलंब न करता तिला रूग्णालयात हलविण्यात आले. नंतर काही वेळातच सुभद्रा प्रसूत झाली. तिने बाळाला जन्म दिला. लोहमार्ग पोलीस ठाण्यातील फौजदार एस. एन. जाधव, एस. एल. भाजीभाकरै यांच्यासह महिला पोलीस अंमलदार पल्लवी रहागंडाले, वैष्णवी दबडे आदींनी केलेली धावपळ यशस्वी झाली.