सोलापूर : पुण्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका गरोदर महिलेला उपचारापूर्वीच दहा लाख रुपये अनामत रक्कम मागून परत पाठविल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप झाल्याने राज्यात हा चर्चेचा विषय ठरला आहे. यातच आता सोलापूर जिल्ह्यात माढा येथे ग्रामीण रुग्णालयात प्रसूत झालेल्या एका बाळंतिणीवर आणि तिच्या पतीवर रुग्णालयातील खोली आणि स्वच्छतागृहाची स्वच्छता करण्याची वेळ आली. याबाबत संबंधित माता आणि तिच्या पतीने माध्यमांशी बोलताना या अस्वच्छतेबद्दल तक्रार केली.
दरम्यान, या घटनेनंतर संबंधित ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी, त्या रुग्ण महिलेला रुग्णालयातील खोली आणि शौचालय साफसफाई करण्यासाठी जबरदस्ती केली नव्हती, असा खुलासा करून जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेच्या (शिंदे) प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी माढा ग्रामीण रुग्णालयास तातडीने भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. या रुग्णालयाच्या स्वच्छतेबाबत आपण पूर्णपणे असमाधानी असल्याचा शेरा त्यांनी मारला.
माढा तालुक्यातील हेमा शैलेश धडे ही गरोदर महिला प्रसूतीसाठी आठवड्यापूर्वी माढा ग्रामीण रुग्णालयात दाखल झाली होती. त्यांचे ‘सिझेरीअन’ झाले. प्रसूतीनंतर बाळंतीण आणि नवजात अर्भकाला रुग्णालयातील एका खोलीत ठेवण्यात आले होते. परंतु त्या संपूर्ण खोलीत मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता होती. रुग्णालयातील एकही सफाई कर्मचारी खोलीत फिरकला नाही. त्यामुळे सलग पाच दिवस खोलीतील स्वच्छता आपणास करावी लागली. स्वच्छतागृहातही अस्वच्छता होती. तेव्हा आम्हा पती-पत्नीला स्वच्छतागृहाची स्वच्छता करणे भाग पडले. ही माहिती स्वतः बाळंतीण हेमा धडे व तिचे पती शैलेश धडे यांनी माध्यमांना दिली आहे.
जबरदस्ती केली नाही
माढा ग्रामीण रुग्णालयात हेमा धडे यांची सुखरूपपणे प्रसूती झाली. रुग्णालयात असताना त्यांनी स्वेच्छेने खोली आणि स्वच्छतागृहाची साफसफाई केली. तिला कोणीही जबरदस्ती केली नाही. रुग्णालयात सफाई कर्मचारी उपलब्ध आहेत.- डॉ. विलास मेमाने, वैद्यकीय अधिकारी, माढा ग्रामीण रुग्णालय
मंत्र्यांच्या कानावर घालणार
या घटनेची माहिती मिळताच माढा ग्रामीण रुग्णालयास भेट दिली असता तेथे कमालीची अस्वच्छता दिसून आली. बाळंतीण माता रुग्णांवर साफसफाई करण्याची वेळ आली. वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून याची माहिती घेतली आहे. हा प्रकार संतापजनक आहे. याबाबत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर हा प्रकार घालणार आहे.- प्रा. डॉ. ज्योती वाघमारे, प्रवक्त्या, शिवसेना</p>