सर्वांचा आवडता गणेशोत्सव आता तोंडावर आला आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थी या दिवशी म्हणजेच गुरुवार दि. 13 सप्टेंबर 2018 रोजी श्री गणेश चतुर्थी असून या दिवशी घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांकडून पार्थिव गणेश मूर्तीची स्थापना व पूजन केले जाणार आहे. या दिवशी सूर्योदयापासून दुपारी 2:52 पर्यंत भद्रा आहे श्रीगणेश स्थापनेसाठी भद्रा दोष मानू नये त्यामुळे गुरुवारी पहाटे ब्राह्म मुहूर्तापासून दुपारी दीड वाजेपर्यंत आपल्या आणि गुरूजींच्या सोईने कोणत्याही वेळी मंगलमूर्ति मोरया… च्या जयघोषात श्री गणेशाची स्थापना करून पूजन करता येईल, या वर्षी गणेश उत्सव ११ दिवसांचा आहे. अशी माहिती पंचांगकर्ते श्री. मोहन दाते यांनी दिली. मूर्ती कशी असावी? तिची प्राणप्रतिष्ठापना कशी करावी? नैवेद्य काय असावा? त्याचा शास्त्रोक्त अर्थ आणि श्री गणेशाचे विसर्जन कसे करावे या आणि अशा अनेक प्रश्नांची श्री दातेंनी दिलेली उत्तरं त्यांच्याच शब्दांमध्ये लोकसत्ता डॉट कॉमच्या वाचकांसाठी येत्या काही दिवसांमध्ये मिळणार आहेत…
अशी असावी घरगुती मूर्ती
घरातील गणेशाची मूर्ती साधारणतः एकवीत उंचीची असावी. ती व्यवस्थित आसनस्थ हवी. तिचे हात, पाय, डोळे, कान सुबक असतील असे पाहावे. हार घालताना, फुले वाहताना अडचण येऊ नये यासाठी मूर्तीचे पाठीमागचे हात व कान यामध्ये अंतर असेल अशीच मूर्ती आणावी. प्लास्टीक, फायबरच्या मूर्ती शास्त्राला मान्य नाहीत. मूर्ती शक्यतो चिकणमाती, शाडूची असावी. आदल्या दिवशीच सायंकाळी आणून ठेवावी म्हणजे सकाळी पूजन करणे सोईचे होईल. मूर्तीस घरात आणते वेळी मूर्ती घेतलेल्या माणसाच्या पायावर पाणी घालून व मूर्तीसह त्यास आरती ओवळून घरात घ्यावे. पुढे सजविलेल्या मखरात पाटावर किंवा चौरंगावर थोड्या अक्षता घालून त्यावर बाप्पाला बसवावे. मूर्ती ठेवताना मूर्तीचे तोंड पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे असणे योग्य आहे, दक्षिण दिशेला मूर्तीचे तोंड असू नये. ते उत्तरेकडेही चालेल. घराच्या प्रवेशद्वाराला फुलांचे तोरण किंवा आंब्याच्या डहाळ्या लावाव्या. दारासमोर रांगोळी काढावी. मंगलवाद्य म्हणून सनई, चौघडा, नादस्वरम् यांची सीडी, कॅसेट हळू आवाजात लावावी.
पूजेची तयारी
हळद – कुंकु, अष्टगंध – शेंदूर, उगाळलेले गंध – चंदन, कापसाची वस्त्र (कापसाची माळ), पत्री – विविध झाडांची पानं, हार – फुलं (काही लाल रंगाची फुलं असावीत), दूर्वा – आघाडा – शमी – तुळस, अक्षता, विड्याची पाने – १५, सुपारी – १० (पांढरी), खारीक – बदाम – खोबरे – गुळाचा खडा, पंचामृत, अत्तर, जानवं, नारळ – १, नैवेद्य (मुख्य नैवेद्य, मोदक, पेढे, इ.), पंचखाद्य, एक रुपयाची नाणी – ५/६, ताम्हन – २, पळी – २, तांब्या, आसन / पाट – २, पाणी टाकण्यासाठी पातेलं, इत्यादि..