उद्याच्या मतदानासाठी सातारा लोकसभा मतदारसंघात सर्व तयारी झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. यांनी दिली. मतदान केंद्रे, मतदान यंत्रे, कर्मचारी या सा-यांची या मतदानासाठीच्या तयारीवर आज शेवटचा हात फिरवण्यात आला. यानंतर मतदानासाठी कर्मचारी आपापल्या भागाकडे रवाना झाले.
सातारा जिल्ह्यात सातारा लोकसभा मतदारसंघातील ६ विधानसभा मतदारसंघ व माढा लोकसभा मतदारसंघातील २ विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या सर्व मतदारसंघात मिळून जिल्ह्यात एकूण २ हजार ९३४ मतदान केंद्रे आहेत. त्या दृष्टीने मतदान केंद्रावर मतदान अधिकारी व कर्मचारी यांची वाहतूक, क्षेत्रीय अधिका-यांसाठी वाहतूक व्यवस्था तसेच मतदानानंतर मतपेटय़ा स्ट्राँग रूम येथे जमा करण्यासाठी अशी वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे.  
सातारा लोकसभा मतदारसंघातील एका विधानसभा मतदारसंघातून अन्य ५ विधानसभा मतदारसंघांत कर्मचा-यांना मतदान काम देण्यात आलेले असते. अशा कर्मचा-यांना दि. १५ एप्रिल रोजी सायंकाळी एका मतदारसंघातून दुस-या मतदारसंघाच्या मुख्यालयात पोहोचवण्यासाठी २५५ एसटी बसची व्यवस्था करण्यात येणार आहे.
विधानसभा मतदारसंघातून प्रत्यक्ष मतदान केंद्रावर अधिकारी व कर्मचारी यांची वाहतूक करण्यासाठी  ३३७ एसटी बसेस, २ टेम्पो, ४० मिनी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच कोयना जलाशय क्षेत्रातील मतदान केंद्रावर कर्मचारी पोहोचवण्यासाठी जिल्ह्यात ९ लाँचची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये ५ लाँच वाई मतदारसंघातील १७ मतदान केंद्रांसाठी, १ पाटण मतदारसंघातील झाडोली या मतदान केंद्रासाठी तर ३ लाँच सातारा मतदारसंघातील जावली तालुक्यातील कारगाव, रावंडी, खिरखिंडी या ३ मतदान केंद्रासाठी ठेवण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात ३५९ क्षेत्रीय अधिका-यांची नेमणूक करण्यात आली असून, त्यांच्यासाठी ३५९ जीप अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. यामध्ये फलटण मतदारसंघात ४२, वाई ६९, कोरेगाव ३३, माण ३२, कराड उत्तर ४७, कराड दक्षिण ४०, पाटण ४८ आणि सातारा ४८ अशी सेक्टर अधिकारी निहाय जीपची व्यवस्था करण्यात येणार आहे. याशिवाय १० टक्के अधिक म्हणजेच ४० राखीव सेक्टर अधिकारी असणार असून त्यासाठीही सुमारे ४० राखीव जीप ठेवण्यात येणार आहेत.  
मतदान झाल्यानंतर मतपेटय़ा स्ट्राँग रूमपर्यंत पोहोच करण्यासाठी २६ वाहनांची व्यवस्था करण्यात येणार आहे. यामध्ये फलटण मतदारसंघात ८ टेम्पो, सातारा मतदारसंघात ४ ट्रक, वाई व माणसाठी प्रत्येकी ३ ट्रक, कोरेगाव, कराड उत्तर, कराड दक्षिण आणि पाटणसाठी प्रत्येकी २ ट्रकची व्यवस्था करण्यात आली आहे.  
सर्वात कमी मतदार चकदेवला
सातारा लोकसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदारसंख्या असलेले वाई विधानसभा मतदारसंघातील ४३१-चकदेव हे मतदान केंद्र असून तेथे ५८ मतदार आहेत. तर सर्वाधिक मतदारसंख्या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील १०८- कराड या मतदान केंद्रावर १४८७ इतकी आहे.  
 

Story img Loader